कोरोना : महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेले जिल्हे रेड झोन, 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्टयात समाविष्ट करण्यात येतील. लॉकडाऊनसंदर्भात रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. एकंदरीतच देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने सरकार सर्वोतापरी खबरदारी घेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी व्हिडिओ संवाद साधला. याच संवादादरम्यान 15 आणि त्यापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या भागाला रेड झोन म्हणून जाहीर करावे, 15 पेक्षा कमी रुग्ण असलेल्या भागाला ऑरेंज झोन म्हणून तर एकही रुग्ण नसेल अशा भागाला ग्रीन झोन म्हणून घोषित करावे असे निर्देश त्यांनी दिले.ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. म्हणजे या दोन झोनमध्ये येणार्या जिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यावर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो. जे उद्योग आपल्या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील, तेथे तशी व्यवस्था करतील आणि कामगारांची व्यवस्था कारखान्यातच करतील, असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही आरोग्यमंत्री टोपेे यांनी सांगितले.
विभागणी : रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड सांगली, औरंगाबाद
ऑरेंज झोन : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोदिया
ग्रीन झोन : धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली
Post a Comment