काळ्याबाजारात जाणारा धान्याचा ट्रॅक्टर पकडला
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर तहसीलच्या पथकाने बुधवारी रात्री साढे आठच्या दरम्यान बोल्हेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून काळ्याबाजारात जाणारा धान्याच्या ट्रॅक्टर पकडला आहे.
याबाबत सविस्तर असे की, बोल्हेगाव येथील गोपाळ कृष्ण कळमकर यांच्या स्वस्त धान्य दुकानातून प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेले धान्य अवैधपणे गोण्यांमध्ये भरून ट्रॅक्टरने काळ्याबाजारात घेऊन जात असल्याबाबतची माहिती तहसीलदार नगर उमेश पाटील यांना मिळाली. या घटनेची तहसीलदार पाटील यांनी गावातील काही नागरिकांना भ्रमणध्वनि द्वारे विचारणा करून माहिती घेतली. माहितीमध्ये तथ्य असल्याची खात्री झाली असता तहसीलदार पाटील यांनी नागपूरचे मंडळ अधिकारी श्रीनिवास आव्हाड यांच्या पथकास बोल्हेगाव येथे त्वरीत जाण्यास सांगितले. त्याचबरोबर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांनासुद्धा तात्काळ मदत पाठविण्यास सांगितली.
तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुलानी यांनाही ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला आणण्याबाबत सुचित केले. याघटनेची अन्नधान्य वितरण अधिकारी पवार यांनी फिर्याद नोंदवनी असून मंडळ अधिकारी यांना धान्य दुकानाला सील करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
सध्या पूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जीवनावश्यक वस्तू बाबत प्रत्येक नागरिक चिंतेत असताना नागरिकांना सदर वस्तूंचा पुरवठा सुकर होणे कामी स्वस्त धान्य दुकानदारांनी नियमांना अनुसरून धान्य वाटप करणे आवश्यक आहे. याबाबत जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत परिपत्रकाद्वारे सर्व दुकानदारांना कडक सुचना देऊन सुद्धा काही दुकानदार माणुसकीला काळीमा फासण्याचे कृत्य करत आहेत ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे. दोन दिवसापूर्वीच नगर तहसील च्या अंतर्गत चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा काढून खुलासा मागविण्यात आला आहे तसेच किमतीपेक्षा जास्तीची रक्कम घेऊन गॅस सिलेंडर विकणाऱ्या गॅस एजन्सी वर कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे. आणि त्याच दरम्यान अशी घटना घडणे हे दुर्दैवी आहे आणि अशाप्रकारे कायदा मोडणाऱ्यांना शासन करून कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक झाले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तू नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी मेहनत घेत आहेत. वरील कार्यवाही साठी मंडळ अधिकारी श्रीनिवास आव्हाड, तलाठी बेलेकर, भापकर यांनी मोलाचे योगदान दिल्याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment