मंत्रालयातील 1421 कर्मचारी मुंबईत पोलिस ठाण्यात सेवेला
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबई पोलीसांवरील कोरोना प्रादुर्भाव रोखताना वाढलेला ताण कमी करण्यासाठी मंत्रालयाच्या विविध विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची आता मदत घेतली जात आहे. मुंबईच्या विविध पोलिस ठाण्यात मंत्रालयातील १ हजार ४२१ कर्मचारी नेमण्यात आले असून परप्रांतीय मजुरांच्या प्रवासाच्या नियोजनाच्या कामी ते आपली सेवा देणार आहेत.
मुंबई कोरोना संसर्गाचा हाॅटस्पाॅट ठरला आहे. मोठ्या संख्येने पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातच परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात पाठवणीच्या नियोजनाचा ताण पोलिस खात्यावर पडला आहे. पोलिसांच्या मदतीसाठी मंत्रालयाच्या विविध विभागातील १४२१ कर्मचारी-अधिकारी यांच्या सेवा मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे जे कर्मचारी मुंबई पोलिसांकडे वर्ग केले आहेत ते सर्व ४० वयाच्या आतले निवडले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी सोमवारी तशी अधिसूचना काढली होती. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी १४२१ कर्मचाऱ्यांची सेवा मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे वर्ग केल्याचा शासन निर्णय जारी केला आहे. मंत्रालयातले हे कर्मचारी राष्ट्रीय स्थलांतरित माहिती प्रणाली (एनएमआयएस) मध्ये डेटा संबंधित काम करणार आहेत. स्थलांतरितांच्या प्रवासाच्या नियोजनासाठी मंत्रालयात एक समिती गठित करण्यात आली आहे. गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष)अमिताभ गुप्ता या समितीचे अध्यक्ष आहेत. मुंबई पोलिसांवरील वाढता ताण कमी व्हावा यासाठी राज्य सरकारने केंद्रीय पोलिस दलाच्या १० तुकड्या यापूर्वीच तैनात केल्या आहेत.
आयएएस अधिकाऱ्यांची ‘यशोधन’ इमारत सील
सचिव ते प्रधान सचिव दर्जाचे अनेक अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेली चर्चगेट परिसरातील ‘यशोधन’ इमारत बृहन्मुंबई पालिकेने सील केली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाला कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे. त्यामुळे २९ मे पर्यंत इमारत सील असणार आहे. दरम्यान, पूर्ण इमारत सील केली नसून एकच मजला सील केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
Post a Comment