देशात जूनपर्यंत 20 हजार कोटींची होईल पीपीईची बाजारपेठ
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - एकीकडे कोरोनामुळे देशातील अनेक प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय तीव्र मंदीच्या स्थितीतून जात आहेत, तर दुसरीकडे दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत देशात पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) किटची मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. एकट्या जानेवारी ते एप्रिल या कालावधीत झालेल्या मागणीमुळे पीपीई किटची वार्षिक उलाढाल २० हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
या उद्योगाशी संबंधितांनी सांगितल्यानुसार, आगामी काळात पीपीई किट्सचा व्यवसाय आणखी वाढेल. दररोज सुमारे चार लाख पीपीई किट तयार केले जात असून त्यांचा वापर देशात केला जात आहे. मे महिन्यात, जेथे दरमहा एक हजार कोटींचा व्यवसाय होता, तो जूनमध्ये १५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. यानुसार बाजारपेठेत वर्षाला १८ ते २० हजार कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. कोरोना नसलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांकडून पीपीई किटची मागणी वाढत आहे. आतापर्यंत पीपीई किटचा वापर केवळ कोविड-१९ रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि देशातील शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोनाबरोबर जगण्याची सवय करावी लागेल. यामुळे येत्या काळात पीपीई किटच्या व्यवसायात आणखी वाढ होईल, असा व्यावसायिकांचा अंदाज आहे. काही काळानंतर विदेशातही निर्यात करता येईल.
रोज ४० कोटींचे पीपीई किट तयार करून विकले जाताहेत
असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्री (एआयएमईडी) चे समन्वयक राजीव नाथ सांगतात की, सध्या दररोज दोन लाख पीपीई किट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले जात आहेत. तसेच ते पीपीई किट तेथील राज्ये व खासगी क्षेत्रातील रुग्णालयात पुरवले जात आहेत. एका पीपीई किटची किंमत ५०० ते २००० रुपयांपर्यंत आहे. रोज ४० कोटी रुपयांचे पीपीई किट बनवून विकले जातात. जे पुढच्या महिन्यात जूनमध्ये ५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. दरम्यान, एन-९५ मास्क आणि सर्जिकल मास्कची मागणीदेखील वाढली आहे. मास्कची बाजारपेठ एक हजार कोटींच्या पुढे गेली आहे. पीपीई आणि मास्क तयार करणाऱ्यांची संख्या २०० पर्यंत आहे.
Post a Comment