नगर, श्रीगोंदा, संगमनेरमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधित व्यक्तींची संख्या 75 तर जिल्ह्याबाहेरील 16 व्यक्ती बाधित / आतापर्यंत 54 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या 02 आणि पुण्याहून आलेल्या 01 अशा 03 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, उर्वरित 43 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून आलेल्या 16 व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत तर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 75 इतकी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
मुंबईतील वरळी येथून पिंपळगाव लांडगा येथे आलेला 62 वर्षीय व्यक्ती, विक्रोळी ( मुंबई ) येथून संगमनेर येथे आलेली 68 वर्षीय महिला आणि घोरपडी ( पुणे) येथून श्रीगोंदा फॅक्टरी येथे आलेला 32 वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बाहेरील जिल्हयातून आलेल्या आतापर्यंत एकूण 16 व्यक्ती बाधीत आढळून आले आहेत.
दरम्यान आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाने 2065 स्त्राव चाचणी नमुने तपासले असून त्यापैकी 1922 नमुने निगेटिव आले आहेत. दहा व्यक्तींचे अहवाल रिपीट पॉझिटिव आले आहेत. 15 नमुन्यांचा निष्कर्ष काढता आला नाही तर 25 अहवाल फेटाळण्यात आले आहेत.
आतापर्यंत 54 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या आपल्या येथे 26 तर नाशिक येथे तीन रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील सात आणि बाहेरील जिल्ह्यातील एक असे आठ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. ***
Post a Comment