निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची बाधा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. दिनांक १९ मे रोजी निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली होती. त्याची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ७४ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील एका व्यक्तीचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीला अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची येथील कोरोना टेस्ट लॅब मध्ये पुन्हा स्त्राव तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
दिनांक १९ मे रोजी नाशिक येथे बाधीत आढळलेला रुग्ण हा मुळचा निमोण येथील आहे. त्याची आई आणि पत्नी यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान लिंगदेव येथील व्यक्ती मुंबईहून गावी आली होती. त्यांना क्वारांटाईन करण्यात आले होते. दहा दिवस झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी हॉस्पिटलमधून घशातील स्त्राव चाचणी खाजगी प्रयोगशाळेतून करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव आला होता. मात्र, स्त्राव चाचणी नमुना घेताना योग्य ते निर्देश पाळले गेले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर रुग्णास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याची पुन्हा स्त्राव चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.
Post a Comment