उत्तर प्रदेशमधील १२४३ मजुरांना घेऊन विशेष श्रमिक रेल्वे नगरहून रवाना । प्रशासनाच्या सकारात्मक प्रयत्नामुळे गावी जायला मिळाल्याची व्यक्त केली भावना
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश मधील १२४३ मजुरांना घेऊन अहमदनगर ते गोंडा विशेष रेल्वे रवाना झाली. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी सकारात्मक प्रयत्न केले. त्याचमुळे आपण मूळगावी परत चाललो आहोत अशी भावना यावेळी मजुरांनी व्यक्त केली. मजुरांची ही भावना पाहून यंत्रणेतील प्रत्येकाला त्यांनी अहोरात्र केलेल्या धावपळीला यश आल्याचे समाधान लाभले. आतापर्यंत जिल्हयातून ६ हजार ४७७ मजूर त्यांच्या मूळ राज्यात परत पाठविण्यात आले आहेत.
आज सायंकाळी जिल्ह्याच्या विविध भागात काम करणारे उत्तर प्रदेशमधील हे मजूर अहमदनगर रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यांना रेल्वे मध्ये बसून देण्यासाठी तालुका यंत्रणेचे अधिकारी आणि पोलिस तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रतेक मजुरांची नोंद करून त्यांना रेल्वे त त्यांच्या जागेवर बसविण्यात येत होते. सोबत फराळ, जेवणाची पाकिटे, पाणी आदी साहित्य देण्यात आले. त्यामुळे या मजुरांनी मनापासून राज्य शासनाने आणि प्रशासनाचे आभार मानले. महसूल, पोलीस यंत्रणेने आमच्यासाठी खूप धावपळ केली. आमच्या घराकडे जाण्यासाठी मदत केली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली.
काहीजण कुटुंबासह तर काहीजण केवळ नोकरीसाठी एकटेच जिल्ह्यात आले होते. लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्यामुळे त्यांना परतावे लागले. केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील तालुकास्तरीय महसूल यंत्रणांना परराज्यातील मजुरांची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, परराज्यात जाऊ इच्छिणार्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर, रेल्वे आणि विशेष बसने त्यांना त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येत आहे.
आजपर्यंत जिल्ह्यातून ६ हजार ४७७ मजुरांनी त्यांच्या मूळ राज्यात परत पाठविण्यात आले आहे. यात सर्वाधिक उत्तर प्रदेश येथील ५१४६ कामगारांचा समावेश आहे. मध्या प्रदेश ११६३, राजस्थान १३४, झारखंड २५, आंध्र प्रदेश ०५ आणि तामिळनाडू येथील ०५ मजुरांनी परत पाठविण्यात आल्याची माहिती यासाठी नेमलेल्या पथकाच्या प्रमुख उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांनी दिली.
Post a Comment