माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर एमआयडीसीमधील कंपन्यांनी कायमस्वरूपी कामगारांना लॉकडाउनच्या काळातील मार्च व एप्रिल महिन्याचे पूर्ण वेतन द्यावे. या मागणीचे निवेदन स्वराज्य कामगार संघटनेने सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कायमस्वरूपी कामगारांना लॉकडाउनच्या काळात मार्च व एप्रिल महिन्यातील वेतन ममता ऑफसेट कंपनीने कायमस्वरूपी कामगारांना दिलेले नाही तसेच सुरक्षेसाठीचे मास्क, ग्लोज, सेफ्टी शुज, गॉगल्स, सॅनिटायझर आदी सुरक्षासाधने कामगारांना पुरविण्यात आलेली नाहीत. या कामगारांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत ममता ऑफसेट कंपनीने कायमस्वरूपी कामगारांची हेळसांड केलेली आहे. आपल्या कार्यालयाकडून ममता ऑफसेट कंपनीला कायमस्वरूपी कामगारांचे मार्च व एप्रिल महिन्याचे संपूर्ण वेतन देण्याचे तसेच कामगारांना सुरक्षा साधने पुरविण्याचे आदेश व्हावे. अन्यथा सोमवारपासून (दि. 25) कामबंद आंदोलन सुरू करण्यात येईल.
तसेच त्रिमुर्ती फुडटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कामगारांना डिसेंबर महिन्यापासून वेतन दिलेले नाही. अन्यथा आपल्या दालनात प्राणांतिक उपोषण करू असा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे.
स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे, सचिव आकाश दंडवते यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी कयरेश्वर सुर्यवंशी, दत्ता रोहोकले, दत्ता बादल, मुत्युंजय पांडे, सतीश गायकवाड आदी उपस्थित होते.
Post a Comment