मान्सून पुन्हा सक्रीय
माय अहमदनगर वेब टीम
पुणे – अम्फान महाचक्रीवादळामुळे मंदावलेला मान्सूनचा प्रवास आता पुन्हा एकदा सक्रीय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तो 27 मे पर्यंत मान्सून बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम, मध्यवर्ती भागासह अंदमान समुद्रात दाखल होईल आणि केरळमध्ये 5 ऐवजी 2 जूनलाच दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
यावर्षी बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर 16 मे ला मान्सून दाखल झाला होता. सरासरीपेक्षा दोन ते तीन दिवस आधीच मान्सून या भागात दाखल झाल्यामुळे केरळपर्यंत मान्सून 30 मे च्या आसपास पोहचेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अम्फान महाचक्रीवादळाने पश्चिम बंगाल, बांगला देश, ते अगदी ओडिशापर्यत जोरदार धडक मारली. या चक्रीवादळाने हवेतील आर्द्रता पूर्णपणे शोषून घेतली. परिणामी मान्सूनचा प्रवास मंदावला आणि अंदमान, निकोबार बेटांवरच थांबला.
दरम्यान, महाचक्रीवादळ सहा दिवसांपूर्वीच शमले आणि आता पुन्हा एकदा मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक असलेले वातावरण तयार झाले आहे. परिणामी 27 मे पर्यत मध्य आणि दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरासह अंदमान समुद्र आणि आसपासच्या भागात मान्सून दाखल होणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम भागापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे.
Post a Comment