ते पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा- सोनिया गांधी


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानसाठी जाहीर केलेले 20 लाख कोटींचे पॅॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे, असं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी म्हटलं आहे. शुक्रवारी देशातील 22 विरोधी पक्षांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्यावेळी केंद्र सरकारच्या उपाययोजनेवर सोनिया गांधींनी ताशेरे ओढले आहेत.

बैठकीसाठी राहुल गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौड़ा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेता शरद पवार, द्रमुक नेता एमके स्टालिन, राजद नेता तेजस्वी यादव, नेशनल काँफ्रेंसचे उमर अब्दुल्ला यांच्यासह 22 पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. मात्र, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीने या बैठकीत सहभाग घेतला नाही.

अम्फान चक्रीवादळात मृत्यू झालेल्या लोकांना या बैठकीत आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या, देशातील लॉकडाऊनबाबत सरकारमध्ये संभ्रम आहे. तसेच, लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी दुसर्‍या उपाययोजनाही आखण्यात येत नाहीत. संकटाच्या या काळात पंतप्रधानांच्या कार्यालयातच संपूर्ण शक्ती आहे, तिथूनच देश नियंत्रित केला जात आहे. 21 दिवसांत करोनावर मात करू असा केंद्र सरकारने केलेला दावा फोल ठरला आहे. त्यामुळे आता लस सापडत नाही तोवर करोनावर मात करता येणं अशक्य आहे, असं दिसतंय. माझ्या मते, सरकारकडे लॉकडाऊनच्या मापदंडाविषयी निश्चित नव्हती. त्यांच्याकडे लॉकडाऊनमधून बाहेर येण्यासाठीही कोणतीही रणनीती नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढचे पाच दिवस हे पॅकेज विस्तृतपणे मांडलं. पण त्यानंतर मात्र हे आर्थिक पॅकेज क्रूर थट्टा असल्याचं स्पष्ट झालं. गरिबांच्या खात्यात सरकारनं थेट पैसे टाकावेत अशी मागणी आमच्यासहीत अनेक विरोधी पक्षांनी केलीय. सर्व कुटुंबांना मोफत रेशन दिलं जावं तसंच घरी परतू इच्छिणार्‍या स्थलांतरीत श्रमिकांना बस आणि रेल्वेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात तसंच कर्मचार्‍यांच्या तसंच नियोक्त्यांच्या सुरक्षेसाठी वेतन सहाय्यता निधी उभारला जावा, अशीही आम्ही मागणी केली होती. परंतु, आमच्या सगळ्या मागण्या न ऐकल्यासारख्या करण्यात आल्या.

अनेक तज्ज्ञांनी 2020-21 मध्ये आपल्या देशाचा विकासदर 5 टक्क्यांवर पोहचेल, अशी शक्यता व्यक्त केलीय. याचे परिणाम भयंकर असतील. सद्य सरकारकडे कोणताही मार्ग नसणं हीच चिंतेची बाब आहे. परंतु, त्यांच्याकडे गरीब वर्गासाठी करुणेचा भावही नसणं ही हृदयविदारक गोष्ट आहे, असंही यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post