तलवारीने वार करून तरुणास लुटले
माय अहमदनगर वेब टीम
श्रीरामपूर – तालुक्यातील हरेगाव रस्त्यावर रात्रीच्या वेळी एका तरुणावर तलवारीने वार करून कट्ट्याचा धाक दाखवित त्याच्याकडील 50 हजार रुपयांची रोकड लुटण्याचा प्रकार घडला. या प्रकरणातील आरोपी श्रीरामपूर शहरातील आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव-श्रीरामपूर जाणार्या रस्त्यावर पाटाच्या चौफुलीवर दि. 20 मे रोजीच्या रात्री बिल्डर उर्फ अकील शरीफ कुरेशी, सलीम जहागिरदार, आसिफ कैची, गुलाब शहा, सलीम जहांगीर, आशू पठाण यांनी त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार श्रीरामपूर कांदा मार्केट शेजारी राहणार्या सचिन कृष्णा वायकर या तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा वायकर यांची मोटरसायकल रोडच्या खाली गेली. ते थांबले असता आरोपी सलीम जागीरदार याने त्याच्या हातातील बंदूक दाखवून शिवीगाळ करून याला घ्या असे, म्हणून आसिफ कैची, अकील कुरेशी बिल्डर, आशु पठाण यांनी वायकर यांच्या खिशातील 50 हजार रुपये काढून घेतले. यावेळी वायकर त्यांना म्हणाला मी तुम्हांला ओळखले आहे. तेव्हा सलीम जागीरदार म्हणाला, त्याने आपल्याला ओळखले आहे, याला मारून टाकू तेव्हा लगेच गुलाब शहा याने त्याच्या हातातील तलवारीने वायकर यांच्या मानेवर वार केला.
परंतु वायकर याने हात मध्ये घातल्याने वार हातावर बसून हाताचे हाड तुटले. यावेळी आशू पठाण याने त्याच्या हातातील गजाने पाठीवर मारले. गुलाब शहा याने त्याच्या हातातील तलवारीने वायकर याच्या पाय व पोटरीवर वार केले. तसेच हात व पायावर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. त्यामुळे जखमी अवस्थेत सचिन वायकर याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी सचिन कृष्णा वायकर याने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध भा. द. वि. कलम 395, 397 आर्म अॅक्ट 3/4 /25 अधिनियम 37/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील बिल्डर उर्फ अकील शरीफ कुरेशी यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मसुद खान यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहे.
वाळूतस्करीतून हा प्रकार घडल्याची चर्चा
श्रीरामपूर तालुका हद्दीमध्ये गोदा पट्ट्यात मातुलठाण, माळेवाडी, गोवर्धन, सरला, उंदिरगाव, हरेगाव आदी परिसरात रात्री मोठ्या प्रमाणावर वाळुतस्करी होते. या परिसरात वाळू तस्करीमुळे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी उदयास आली आहे. पोलीस व महसूल प्रशासनास वाळुतस्कर जुमानत नाहीत. या मारहाणीच्या प्रकारातही वाळुतस्करीचा गंध येत असल्याची चर्चा परिसरात आहे.
Post a Comment