पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी एका वर्षासाठी स्थगित
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर घातलेली बंदी केंद्र सरकारने एका वर्षासाठी स्थगित केली आहे. यामुळे मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदीचा निर्णय एका वर्षासाठी स्थगित करण्यात येत असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी जाहीर केले. या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी ज्यांनी पूर्वीच पीओपीच्या मूर्ती तयार केल्या असतील, अशा मूर्तिकारांचे या निर्णयामुळे नुकसान होणार नाही, असे जावडेकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. खरे तर, महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती निर्मितीचे काम काही महिने आधीच सुरू करण्यात येते. सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राज्यात अर्ध्याहून अधिक मूर्ती तयार झालेल्या होत्या. या निर्णयामुळे असंख्य मूर्तिकारांचे मोठे नुकसान होणार होते. हाच विचार करून केंद्र सरकारने आपला निर्णय स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले.
ही बंदी घालताना प्रदूषण मंडळाने पर्यावरणाचा विचार करण्यात यावा, प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरण पूरक अशा घटकांनीच मूर्ती तयार कराव्या, तसेच रासायनिक रंगांचा वापर करू नये, अशा मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या होत्या. गणेशोत्सवाला काहीच दिवस उरले असताना, या निर्णयामुळे मूर्तिकारांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. आता मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे.
Post a Comment