मधुमेहींसाठी फळे, भाज्या निवडतांना ? घ्या ही काळजी


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - मधुमेही व्यक्तिंना त्यांच्या आहारातील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करावा लागतो. वेगवेगळी पथ्य हाच या आजाराचा मुख्य गाभा असल्यामुळे रोजच्या आहारातील फळे आणि भाज्या यांच्या बाबतीतही काही नियम पाळल्यास आजार काही प्रमाणात सुकर होण्याची शक्यता असते. त्यासंबंधीचीच माहिती…

दैनंदिन आहारामध्ये प्रत्येक मधुमेही व्यक्तीने भाज्या आणि फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण त्यामधून शरीराला आवश्यक असणार्‍या जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर यांचा पुरवठा होण्यास मदत होते. तसेच जीवनसत्त्वे आणि फायबरमुळे शरीरामध्ये अधिक प्रमाणात कॅलरीज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नैसर्गिक स्वरूपातील फळे आणि भाज्यांचा आहारामध्ये जास्त समावेश करावा.

ज्या फळे आणि भाज्यांमध्ये कॅलरीज आणि पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. अशा फळे आणि भाज्यांचा
आहारातील समावेश अल्प असावा. अशा वेळी फळांमधील कॅलरीजनुसार फळे निवडावीत. सुका मेवा जास्त खाणे टाळावे. फळांमध्ये कलिंगड, खरबूज,लिंबू यांचा आहारातील समावेश वाढवावा. तर सफरचंद, पपई, संत्रे, मोसंबी,
स्ट्रॉबेरी, जांभूळ यांचा आहारातील समावेश आवश्यक असला तरी तो बेतानेच करावा. तर केळी, आंबे, द्राक्षे, सिताफळ यांचा आहारातील समावेश अल्प असावा.

भाज्यांमध्ये काही थोड्या भाज्या सोडल्या तर बहुतेक सर्व भाज्या मधुमेही व्यक्ती मुक्तपणे खाऊ शकतात. फ्लॉवर, कोबी, नवलकोल, दुधी भोपळा, कारले, भेंडी, तोंडली आणि पडवळ या भाज्यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. तर गाजर, कांदा, बीट, बीन्स, पावटा यांचा आहारात समावेश केला तरी तो बेताने करावा. मात्र मधुमेही व्यक्तींसाठी भाज्या करत असताना त्यामध्ये दाणे, खोबरे, तेल, तूप आणि बटर यांचा वापर मर्यादित करावा. नैसर्गिकरीत्या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी असल्या तरी भाजी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पदार्थांमुळे त्यातील कॅलरीज वाढतात. त्यामुळे ग्रेव्ही पद्धतीच्या भाज्या खाणे शक्यतो टाळावे. त्याऐवजी भाज्या उकडून, कोशिंबीर किंवा पचडीच्या स्वरूपात खाणे जास्त लाभदायक ठरते.

बटाटे, रताळी, सुरण यांमध्ये पिष्ट पदार्थांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या घटकांचा आहारातील समावेश कमी करावा. बटाटेवडे, पोटॅटो चिप्स, वेफर्स, चिवडा असे बटाट्याचे तळलेले पदार्थ खाणेही टाळावे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post