पालकमंत्र्यांकडून सीमेबाहेरून पक्षपदाधिकार्यांचे ‘नाराजीहरण’!
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरू आहे. या नाराजांची समजूत काढण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरूवारी दुपारी शिरूर जवळील न्हावरा फाटा येथे जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी नाराजांच्या भावना समजून घेतल्या आणि आपली बाजूही मांडली. यापुढे एकत्र काम करत पक्ष मजबुतीच्या आणाभाकाही घेण्यात आल्या.
दरम्यान, यावेळी पक्षाच्या पदाधिकार्यांची चौकशी करत पालकमंत्र्यांनी ओळख करून घेतली.काही दिवसांपासून जिल्हा राष्ट्रवादीत पालकमंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात नाराजीनाट्य सुरू आहे. ही बाब पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी पक्षाचे जिल्हा निरिक्षक अंकुश काकडे यांच्याकडे याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानुसार गुरूवारी न्हावरा फाटा येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला आ. रोहित पवार, आ. आशुतोष काळे, आ. संग्राम जगताप, आ. नीलेश लंके, जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी आ. चंद्रशेखर घुले, माजी आ. राहुल जगताप, माजी आ. पांडुरंग अभंग, घनश्याम शेलार, नगरचे शहरजिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या या बैठकीत सुरूवातीला पालकमंत्री मुश्रीफ यांनी त्यांच्यावर नगरची जबाबदारी कोणत्या स्थितीत सोपविण्यात आली, याची माहिती दिली. नगरच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक नव्हतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपविण्यात येणार होते. मात्र, मंत्री थोरात यांनी त्यास नकार दिल्याने तिढा निर्माण झाला. हा तिढा सुटेपर्यंत पक्षाच्या आदेशामुळे सुरूवातीच्या काळात मी नगराला येणे टाळले. मात्र, त्यानंतर पक्षाच्या आदेशामुळे नगरचे पद स्वीकारावे लागले, असे त्यांनी सांगितले.
नगरला आल्यानंतर पक्ष कार्यालयात दोनदा बैठका घेतल्या. पक्षाच्या आमदारांचे प्रश्न मार्गी लावण्यास सुरूवात केली. त्यानंतर अधिवेशन सुरू झाले आणि अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात करोनाचा कहर सुरू झाला. यामुळे नगर जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकार्यांशी संपर्कास व्यत्यय आला. संपर्क वाढवावा लागेल, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी मान्य केले. यापुढे पक्षाचे पदाधिकारी आणि आमदारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
राज्यमंत्री तनपुरे गैरहजर
या बैठकीला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे त्यांच्या नियोजित व्हिडीओ कॉन्फरन्समुळे गैरहजर होते. राज्यातील परीक्षेसंदर्भात सर्व विद्यापिठाच्या कुलगुरूंसोबत मंत्री तनपुरे यांची कॉन्फरन्स असल्यामुळे ते या बैठकीला हजर राहू शकले नाहीत, असे पक्षातील सुत्रांनी सांगितले.
Post a Comment