मुंबईहून आलेल्यांनी उडविली नगरकरांची झोप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - मध्यंतरी करोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले असतानाच, गत दोन दिवसांपासून मुंबई-पुण्याहून आपल्या गावी परतणारी मंडळी आणि पाहुण्यांमुळे करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या नव्या करोना बाधितांनी नगर जिल्ह्यातील नागरिकांची झोप उडविली आहे. तसेच वाढत्या संख्येमुळे प्रशासनही चिंताग्रस्तही झाले आहेत. अन्य जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात येणार्यांबाबत खबरदारी घेण्यात येऊन त्यांना वेळीच क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सोमवारी दिवसभरात नगरच्या जिल्हा रुग्णालयातील करोना तपासणी प्रयोग शाळेत केलेल्या नमुने तपासणीत मुंबई-पुण्यावरून आलेल्या आठ जणांना करोनाची बाधा झालेली आहे. यामुळे जिल्ह्याबाहेरून आलेल्या बाधितांचा आकडा 16 वर पोहचला असून बाहेरून आपल्या गावी परतणार्या आणि पाहुण्यांमुळे नगर जिल्हावासीयांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान जिल्ह्यातील मूळ व्यक्तींपैकी करोना बाधितांचा संख्या 75 असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कळविण्यात आले आहे.
सोमवारी (सकाळी) आलेल्या अहवालात जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या पाच व्यक्ती करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. याशिवाय, दोन रुग्णांचे रिपीट अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील 31 वर्षीय पुरुष, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 33 वर्षीय पुरुष, अकोले तालुक्यातील ढोकरी येथील 35 वर्षीय पुरुष, नगर तालुक्यातील वाकोडी येथील 43 वर्षीय पुरुष आणि निंबळक येथील 30 वर्षीय महिला करोना बाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. मात्र, या व्यक्ती मुंबईहून नगर जिल्ह्यात आल्या होत्या.
याशिवाय नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील करोना बाधित व्यक्तीचा दहा दिवसानंतरचा स्त्राव चाचणी अहवालही पॉझिटिव आला आहे. घाटकोपर येथून लिंगदेव (अकोले) येथे आलेल्या एका व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयाने त्याची पुन्हा येथे चाचणी केली असता तो बाधित असल्याचे आढळून आले आहे.
त्यानंतर सायंकाळी आलेल्या अहवालात मुंबईहून आलेल्या दोन आणि पुण्याहून आलेल्या एक अशा तीन व्यक्ती करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहेत. उर्वरित 43 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मुंबईतील वरळी येथून पिंपळगाव लांडगा येथे आलेला 62 वर्षीय व्यक्ती, विक्रोळी ( मुंबई ) येथून संगमनेर येथे आलेली 68 वर्षीय महिला आणि घोरपडी ( पुणे) येथून श्रीगोंदा फॅक्टरी येथे आलेला 32 वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बाहेरील जिल्हयातून आलेल्या आतापर्यंत एकूण 16 व्यक्ती बाधीत आढळून आले असल्याची माहिती अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 2 हजार 65 स्त्राव चाचणी नमुने तपासले असून त्यापैकी 1 हजार 922 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 15 नमुन्यांचा निष्कर्ष काढता आला नाही तर 25 अहवाल फेटाळण्यात आले आहेत. आतापर्यंत 54 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या नगर येथे 26 तर नाशिक येथे तीन रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील सात आणि बाहेरील जिल्ह्यातील एक असे आठ रुग्ण दगावले आहेत.
Post a Comment