' परशा'च्या नावाने नगरच्या महिलेला गंडा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - ' सैराट'फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून नगर शहरातील महिलेची फसवणूक करणाऱ्या पुण्या भामट्याला अहमदनगर सायबर सेल पोलिसांनी आज अटक केली . शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज ( रा . पिंपरी चिंचवडी , जि . पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे . त्याने महिलेकडून घेतलेले मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे.
एमआयडीसी येथे राहत असलेल्या महिलेने अहमदनगर सायबर सेलकडे २२ मे रोजी तक्रार केली होती . या महिलेचा चार महिन्यांपूर्वी फेसबुकवर ' सैराट'फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या बनावट खात्याशी संपर्क आला . पिंपरी चिंचवडी येथील शिवदर्शन चव्हाण हा हे खाते हाताळत होता . याच खात्यावरून त्याने नगरमधील महिलेशी मैत्री वाढवली . अभिनेता आकाश ठोसर म्हणूनच शिवदर्शन याने या महिलेशी फोनवरही संभाषण सुरू ठेवले . त्यातून पुढे त्याने आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून पैशाची गरज व्यक्त केली . या महिलेने एवढा मोठा अभिनेता पैसे मागतो आहे , म्हणून लगेचच पैसे देण्याची तयारी दर्शवली . हे पैसे घेण्यासाठी नगरला येतो , असे त्याने महिलेला सांगितले . आकाश ठोसर स्वतः पैसे घेण्यासाठी येणार म्हटल्यावर महिला हुरळून गेली होती . पण आकाश ठोसर म्हणून बोलत असलेल्या शिवदर्शन याने ऐन वेळेला महिलेला संपर्क साधूनमला यायला जमणार नाही , मित्राला पाठवितो , असे सांगितले . त्यानुसार आकाश ठोसर असल्याचा अभिनय करणारा शिवदर्शन स्वतः नगरमध्ये आला आणि या महिलेकडून दागिने घेवून गेला . दागिने मिळाल्यानंतर शिवदर्शन याने आकाश ठोसरच्या नावाने हाताळत असलेले आणि त्याने तयार केलेले फेसबुकवरील बनावट खाते बंद केले . त्यावरून महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले . तिने अहमदनगर सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली होती .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post