बंदुकीचा धाक दाखवून लुटणारे तिघे जेरबंद


माय अहमदनगर वेब टीम
शिर्डी - राहाता येथे बंदुकीचा धाक दाखवून रस्ता लूट करण्याच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या तिघांपैकी एकजण शिंगवे येथील, दुसरा पुणतांब्याचा तर तिसरा राहाता येथील आहे.
याबाबत माहिती अशी की, भाजीपाला विकून जाणार्‍या मोटारसायकलस्वारास बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणार्‍यांना नागरिकांनी पाठलाग करुन पकडले.

लोकांचा जमाव पाहून एकाने गोळीबार केल्याप्रकरणातील एकास अटक केली. तसेच दुसर्‍या घटनेत पुन्हा मोटारसायकल स्वारास लुटल्याप्रकरणातील चार जणांना नगर गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे, एक रिकामी पुंगळी, वेगवेगळ्या कंपनीचे सात मोबाईल असा शाईन व पल्सर कंपनीच्या दोन मोटारसायकली असा एकूण 1 लाख 69 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चितळी रेल्वे स्टेशनजवळून जाणार्‍या जोडप्यास पिस्टलचा धाक दाखवून लुटल्याचीही कबुली या चोरट्यांनी दिली.

राहाता येथील विकास पोपट तरटे हा राहाता बाजारात भाजीपाला विकून मोटारसायकलवरुन घरी जात असताना अचानक विना नंबरच्या पल्सर मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यास आडवे होवून विकास तरटे यास बंदुकीचा धाक दाखवून खिशातील 6 हजार रुपये बळजबरीने काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना तरटे याने आरडओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी नागरिकांनी पाठलाग करुन त्यातील एकास पकडून राहाता पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसर्‍या 11 मे रोजी घडलेल्या घटनेत वैभव विठ्ठल तरटे हा राहाता येथे भाजीपाला विकून घरी जात असताना त्यास विनानंबरच्या पल्सरवरुन आलेल्या तिघांनी अडवून त्यास बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडून सहा हजार रुपये काढून घेतले.

याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे व पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनेची माहिती घेवून पथकाची नियुक्ती केली. आरोपींचा शोध घेतला असता यातील मुख्य आरोपी किरण सोनवणे हा राहाता तालुक्यातील शिंगवे येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या पोलीस पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे पोलिसांनी विचारपुस केली असता बाबासाहेब शिवाजी पगारे (शिंगवे), अनिल ज्ञानदेव शिंदे (पुणतांबा), विकी विष्णू चावरे (राहाता) या तिघांना घेवून गुन्हा केला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी याआरोपींकडून या गुन्ह्यात वापरलेले 50 हजार रुपये किंमतीेचे दोन गावठी कट्टे किरण उर्फ अ‍ॅन्थोनी छगन सोनवणे व अनिल ज्ञानदेव शिंदे यांच्याकडून हस्तगत केले.

1400 रुपये किंमतीचे सात जिवंत काडतुसे, 38 हजार रुपये किंमतीचे एक रिकामी पुंगळी, 40 हजार रुपये किंमतीचे वेगेवेगळ्या कंपनीचे सात मोबाईल, एमएच 15 जीएन 8527 शाईन कंपनीचमएच 20 एडव्ही 7772 क्रमांकाची पल्सर असा एकूण 1 लाख 69 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

या आरोपींनी चितळी स्टेशनवरुन मोटारसायकलवरुन जाणार्‍या एका पती-पत्नीस अडवून त्यांना पिस्टलचा धाक दाखूवून महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र, कानातील कर्णफुले, असा ऐवज लुबाडला होता. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विकी चावरे हा राहात्यातील सराईत गुन्हेगार आहे. त्याने राहाता बाजार समिती जवळ परप्रांतीय ट्रक चालकांना लुटले आहे. तसेच राहाता पोलिसावरही यानेच हल्ला केला होता. राहाता परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता.

वरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द लासलगाव, नाशिक, येवला, कोपरगाव, शिर्डी आदि 35 पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या सर्व पोलीस स्टेशन या आरोपींचा शोध घेत होते. परंतु गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चांगली कामगिरी करुन या टोळीस जेरबंद केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post