‘अवकाळी’चा नगरला तडाखा, वादळामुळे अस्तगावात प्रचंड नुकसान
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहर व सावेडी उपनगराच्या परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारे आणि विजाच्या लखलखाटात अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे लॉकडाऊनच्या काळात कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. जवळपास दीड तास पाऊस सुरू होता. यामुळे शहराच्या सखल भागात पाणीच पाणी झाले.
नगर शहर आणि परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. दोन दिवसांपासून उकाडा जाणवत होता. त्यातच शुक्रवारी दुपारी अडीच्या सुमारास वादळी वार्यासह पाऊस सुरू झाला. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी आहे. मात्र, किराणा, औषधे, भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणार्या नागरिकांची अचानक सुरू झालेल्या पावसामुळे धावपळ उडाली.
रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांचे हाल झाले. जवळपास दीड तास सुरू असणार्या या पावसामुळे शहरातील माळीवाडा, पटवर्धन चौक, मार्केट यार्ड, सर्जेपुरा, सावेडीतील कुष्ठधाम रोड, पाइपलाइन रोड, यासह तालुक्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. त्यामुळे वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती. या पावसामुळे शहरात काही पत्र्याचे शेड पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
स्वास्तिक चौकातील एका हॉटेलची संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळं नुकसान झाले. मार्केटयार्ड परिसरात सुद्धा एक पत्र्याचे शेड पडले आहे. यासह काही ठिकाणी झोड पडल्याची माहिती आहे. नगर शहरात एका ठिकाणी विज कोसळ्याचे सांगण्यात आले. मात्र, यात किरकोळ हानी झाल्याचे चर्चा होती.
Post a Comment