..म्हणून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – सामान्य परिस्थितीमध्ये राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन साधारणपणे जून महिन्यात घेतलं जातं. मात्र, करोना संकटामुळे राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जून ऐवजी 3 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्रिमंडळातीव इतर मंत्र्यांच्या संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली. दरम्यान, या सगळ्या परिस्थितीमध्ये महत्त्वाच्या बाबींसाठी पुरवणी मागण्या मांडायची वेळ आली, तर मध्ये एक दिवसाचं विशेष अधिवेशन देखील बोलवता येईल, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी जाहीर केलं.
याआधी पावसाळी अधिवेशन 22 जून रोजी घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेला लॉकडाऊन आणि त्यानुसार असलेले प्रवास आणि इतर गोष्टींवरचे निर्बंध या पार्श्वभूमीवर अधिवेशन पुढे ढकलण्यावर विचार सुरू होता. अखेर हे अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन पूर्णवेळ होणार नसून कमी दिवसांचं असेल, असं देखील सांगितलं जात आहे.
.
विरोधकांचा पाठिंबा – दरम्यान, राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याच्या घेतलेल्या या निर्णयाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला आहे. शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखाद दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकारचं नियोजन असेल, तर त्यालाही आमचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Post a Comment