पेट्रोल-डिझेल 5 रुपयांनी महागले
माय अहमदनगर वेब टीम
नवीदिल्ली – लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर भारतात इंधनाची वाढती मागणी यामुळे तेल कंपन्यांनी गेल्या आठवडाभरापासून दररोज पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 7 जून पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी तब्बल 5 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी लॉकडाऊनमुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या मध्यमवर्गीयांच्या खिशाला आणखी झळ पोहचू लागली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 16 मार्चपासून 80 दिवसांपेक्षा जास्त काळ कंपन्यांनी इंधन दरातील सुधारणा बंद केली होती. त्यानंतर 7 जून पासून दररोजचा आढावा सुरु झाला आही दरवाढही सुरु झाली आहे. दररोज होत असलेल्या दरवाढीमुळे आठवडा भरात दोन्ही इंधनांच्या दरात सरासरी 4.50 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे.
दरवाढीमुळे खिशाला बसणार झळ!
कोरोनाची साथ रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजचा इंधन आढावा स्थगित केला होता. तब्बल 83 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली जात आहे. मागील दोन महिने कठोर टाळेबंदीने रस्ते वाहतुकीवर निर्बंध होते. यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी घसरण झाली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उणे स्तर गाठला होता. त्यामुळे कमॉडिटी बाजारात खळबळ उडाली होती. तेलाची साठवणूक परवडत नसल्याने तेलाच्या किमती गडगडल्या होत्या.
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांची आणि पेट्रोल विक्रेत्यांची गेल्या महिन्यात बैठक पार पडली. यात जूनपासून दैनंदिन दर आढावा घेण्याचे मान्य करण्यात आले. केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेससह एक्साइज ड्युटी अनुक्रमे 10 आणि 13 रुपये प्रति लिटर वाढवली, तर पेट्रोल-डिझेलवर रोड सेस 8 रुपये आणि अबकारी कर दोन व पाच रुपयांनी वाढवला आहे.
दरम्यान आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये 2 टक्के वाढ झाली. कच्च्या तेलाचा भाव (Crude Oil) सिंगापूरमध्ये प्रती बॅरल 38.73 डॉलरवर गेला. त्यात 18 सेंट्सची वाढ झाली. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटमध्ये क्रूडचा भाव प्रती बॅरल 0.2 टक्क्याने कमी होऊन 36.26 डॉलर झाला.
नगरमधील पेट्रोल डिझेलची आठवडा भरातील दरवाढ
दिनांक पेट्रोल डिझेल
1 जून 78.13 67.04
7 जून 78.71 67.05
8 जून 79.29 68.16
10 जून 79.81 68.70
11 जून 80.77 69.68
12 जून 81.31 70.22
13 जून 81.88 70.76
14 जून 82.47 71.36
15 जून 82.93 71.91
(डेपोपासूनचे अंतरानुसार प्रत्येक पंपावरील दर कमी अधिक)
Post a Comment