गुड न्युज : अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुकलीची कोरोनावर मात
७० वर्षाच्या आजीबाईने कोरोनाला हरवलं
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरातील माळीवाडा येथील एका ७० वर्षांच्या आजीबाईना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते.. मात्र, आजीबाईनी अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत त्या आज बरे होऊन घरी परतल्या आहेत.. हीच गोष्ट संगमनेर येथील कोल्हेवाडी रोड येथील एका १३ महिन्यांच्या चिमुकलीची! कुटुंबातील सदस्याला झालेला कोरोना तिच्यापर्यंत पोहोचला. मात्र, तीही यावर मात करीत पुन्हा सुखरूप घरी परतली आहे. उपचारांना योग्य प्रतिसाद दिला तर कोरोना पराभूत होऊ शकतो हेच या आजीबाई आणि चिमुकलीने दाखवून दिले आहे.
या दोघी सोबतच एकूण १९ रुग्ण आज कोरोनातून बरे झाले. बूथ हॉस्पिटलमधून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांनी या रुग्णांना निरोप दिला आणि पुढील चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या.
या आजीबईंच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाने गाठले आणि तो त्यांच्यामार्फत आजीबाई पर्यंत पोहोचला. त्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. येथेही त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला. मनाचा ठाम निग्रह ठेवत त्यांनी आता या आजारावर मात केली आहे. या आजीबाई सोबत संगमनेर येथील ही चिमुकली बरी झाली. तिलाही तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या मार्फत कोरोनाचा संसर्ग झाला. तिने डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद दिला आणि तीही या आजारातून बरी होऊन आज घरी परतली.
या दोघींनीही कोरोनातून बरे होऊन या आजाराला आपण हरवू शकतो, असा आत्मविश्वास इतरांमध्ये ही निर्माण केला आहे. हा आजार लपवून न ठेवता त्यावर योग्य वेळी उपचार घेतले पाहिजेत. लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतले पाहिजेत योग्य वेळी उपचार घेतले तर कोरोनावर मात करू शकतो एवढे नक्की!
Post a Comment