लाॅकडाऊनने पुणे-मुंबईतील ६८ हजार नाेकऱ्या धोक्यात
माय अहमदनगर वेब टीम
पुणे - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुणे-मंुबईतील माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार कपात आणि नोकरी गमवावी लागल्याची प्रकरणे घडली आहेत. नॅशनल इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी एम्प्लॉइज सिनेटकडे ६८ हजार तक्रारी आल्या असल्याचे संघटनेचे सरचिटणीस हरप्रीत सलुजा यांनी सांगितले. यामुळेच आयटी कर्मचाऱ्यांनी ‘जस्टिस फॉर एम्प्लॉइज’ हे ऑनलाइन आंदोलन सुरू केले आहे.
आठवड्यातील पाच दिवस काम, मोठ्या पगाराची नाेकरी, उच्चभ्रू राहणीमान, आंतरराष्ट्रीय कंपन्यांत काम करण्याची संधी यामुळे आयटी क्षेत्रातील नोकरीला प्रतिष्ठा मिळाली. परंतु, काेराेना आणि त्यापाठोपाठ झालेल्या लाॅकडाऊनचा आयटी क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात सुमारे ६ लाख आयटी कर्मचारी असून त्यापैकी साडेतीन ते चार लाख कर्मचारी पुणे परिसरातील विविध आयटी कंपनी, बीपीआे (काॅल सेंटर), केपीआे (बॅक आॅफिस) मध्ये काम करतात,असे सलुजा यांनी सांगितले. मात्र अनेक नामांकित कंपन्यांनी कामगारांना कमी केले, ५० टक्क्यांपर्यंत वेतन कपात किंवा बेंचवर ठेवण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ६८ हजार कर्मचाऱ्यांपैकी अनेकांची नोकरी गेली,काहींना वेतन कपातीला सामोरे जावे लागले आहे.
सरकारी नोटीसीला केराची टोपली :
लॉकडाऊन काळात कर्मचारी अथवा वेतन कपात करु नये, असे केंद्र सरकारने सांगितले होते. त्यानुसार पुणे कामगार आयुक्तांनी काही नामांकित कंपन्यांना नोटीसाही बजावल्या परंतु आयटी कंपन्यांनी या नोटीशींना थेट केराची टोपली दाखवली. दरम्यान,या विरोधात आयटी कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून याबाबत १२ जून राेजीच्या सुनावणीत निर्णय हाेणे अपेक्षित आहे.
Post a Comment