सीए, सीएस परीक्षेची तारीख ठरली


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया' अर्थात 'आयसीएआय'ने विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी 'ऑप्ट आउट'चा पर्याय दिला आहे. त्यामुळे ते नोव्हेंबरमध्ये परीक्षा देऊ शकतील. मात्र, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी (मे मधील पुढे ढकललेली) परीक्षा २९ जुलैपासून होणार आहे, असेही 'आयसीएआय'ने स्पष्ट केले आहे.
जुलैतील परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नावनोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची गरज नाही. त्याचबरोबर मे २०२० चा प्रयत्न (अटेम्प्ट) त्यांच्या शैक्षणिक आलेखात मोजला जाणार नाही.
जुलैमधील परीक्षा सुरक्षित वावराचे सर्व निकष पाळून, सर्व आवश्यक साधनांसह घेण्यात येईल. जुलैच्या पहिल्या आठवड्यात देशभरातील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय त्या वेळेस लागू असलेल्या केंद्र सरकारच्या निर्देशांनुसारच घेतला जाईल. एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नसल्यास त्यांना नोव्हेंबरमध्ये परीक्षा देता येईल.
दरम्यान, कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात बदल करायची इच्छा असल्यास त्यांना संस्थेच्या वेबसाइटवर २० जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
'ऑप्ट आउट' होण्यासाठी
जुलै २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या; परंतु परीक्षा देऊ इच्छित नसलेल्या विद्यार्थ्यांना २० जूनपर्यंत संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज (डिक्लरेशन) करावा लागेल. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याची जुलै २०२० परीक्षेसाठीची नोंदणी रद्द होऊन ती नोव्हेंबर २०२० मधील परीक्षेसाठी वर्ग होईल. मात्र, हा अर्ज एकदाच करता येणार आहे.
सीएस प्रवेश परीक्षा ऑगस्टमध्ये
'इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया' अर्थात 'आयसीएसआय'तर्फे कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. देशभरातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 'कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट' १७ जुलै रोजी होणार होती. ती आता २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २७ जुलै २०२० पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव आशिष मोहन यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post