पुणे – करोनामुळे दोन महिने कारखानदारी बंद असल्याने कामगारांपासून उद्योजकांवर आर्थिक कुर्हाड कोसळली असताना आता आणखी एक नवीन संकट उभे राहिले आहे. कंपनी चालू करायची असेल तर दर महिन्याला आगाऊ हप्ता सुरू करा, कंत्राटी ठेके आम्हाला द्या, आमचेच कामगार घ्या आणि भूमीपुत्रांना नोकर्या द्या अशा धमक्या, निरोप उद्योजकांपर्यंत पोहचविला जात असून, यामुळे उद्योजक प्रचंड तणावाखाली वावरत आहेत.
करोनामुळे गेल्या दोन महिन्यापासून पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र पूर्ण बंद होते. त्यामुळे कामगारांपासून उद्योजकांवर आर्थिक संकट आले. अनेक उद्योजकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. या पाश्वभूमीवर गेल्या आठवड्यात रेड झोन वगळता कारखाने सुरु झाले. परवानगी मिळाल्यानंतर उद्योजकांनी काटेकोर नियोजन केले. यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करायची वेळ आली. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी, पुढारी आणि माथाडी कामगारांनी आम्ही सांगतो त्याच कामगारांना कामावर घ्या, आमच्याच एजन्सीकडून कच्चा माल घ्या, असे सांगायला सुरुवात केली आहे. पूर्वीचे करार मध्येच मोडता येत नाहीत, असे मालकांकडून सांगण्यात आल्यावर लाखो रुपयांची खंडणी मागितली जाते. एकीकडे कामगारांची कमतरता आणि दुसरीकडे वाढता राजकीय हस्तक्षेप यामुळे औद्योगिक क्षेत्र हैराण झाले आहे.
उद्योजकांना अशा प्रकारे वेठीला धरणार्या पुढार्यांना आणि कामगार संघटनांना करोना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि मोक्का कायद्याअंतर्गत लॉकअप करण्याची हमी उद्योजकांना द्या, अन्यथा कारखाने बेमुदत बंद ठेवू, असा इशारा पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी दिला आहे.
Post a Comment