या भागात करोनाची एन्ट्री; पहिला रुग्ण आढळला
माय अहमदनगर वेेेब टीम
कोल्हार - कोल्हार बुद्रुक येथे पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने गावात करोनाची एन्ट्री झाली. त्यामुळे काल येथे खळबळ उडाली. 55 वर्षीय व्यावसायिक करोना पॉझिटिव्ह आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबातील व जवळच्या संपर्कातील एकूण 7 जणांना तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. कोल्हार ग्रामपंचायतने संबंधित परिसर कन्टेटमेंट झोन करून सील करण्यात आला. 15 दिवसापूर्वी त्यांच्या मुलाचा शुभविवाह होता. वर्हाडी मंडळी ठाणे येथील होती. कदाचित तेथून हा संसर्ग झाला असल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी वर्तविला.
या व्यावसायिकास श्वसनाचा त्रास, ताप व जुलाब होत असल्याने ते लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेले. तेथे करोना लक्षणाआधारित तपासणी केली गेली. काल अहवाल प्राप्त झाला. त्यात ही व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या उपचार केंद्राद्वारे कळविण्यात आले.
बाधित व्यक्तीवर याच करोना उपचार केंद्रांमध्ये पुढील उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या 7 जणांना काल दुपारी 2 वाजता प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पुढील तपासणीकरिता पाठविण्यात आले. त्यांचे अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील असा अंदाज आहे. अहवाल आल्यानंतर गावामध्ये लॉकडाऊन करायचा की नाही, याबद्दल पुढील दिशा ठरविली जाईल, असे कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी सांगितले.
सदर व्यक्तीचे दुकान स्व. माधवराव खर्डे पा. चौकात असल्याने हा परिसर त्याचप्रमाणे बाधित व्यक्ती बेलापूर रोडलगतच्या लक्ष्मीबाई कुंकूलोळ संकुलात वास्तव्यास असल्याने तेथील काही भाग सील करण्यात आला आहे. गावात पहिला करोना रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात असून आता यापुढे आणखी खबरदारी व काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील एका मंगल कार्यालयात सदर करोनाबाधित रुग्णाच्या मुलाचा शुभविवाह पार पडला. या मंगल कार्यालयाच्या मालकास काल कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये बोलावून घेऊन विचारणा करण्यात आली. या शुभविवाहप्रसंगी उपस्थित असणारे सध्या धास्तावले असल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्राच्या आशा सेविकांचे 11 पथक बनविण्यात आले. या पथकांकडून शनिवारपासून नियमित संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास तथा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास स्वतःहून कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी केले आहे.
Post a Comment