मी पक्ष सोडला म्हणून थोरतांना पद
माय अहमदनगर वेब टीम
लोणी– नेहरु, गांधींचे विचार सोडून कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशअध्यक्षांना मातोश्रीच्या दारात जावे लागते हिच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्थान आहे याबद्दल न बोललेच बरे, मी पक्ष सोडला म्हणुन त्यांना पद मिळाले. आता मंत्री पद टिकविण्यासाठी त्यांची धडपड आहे. कोण कोणाच्या पाया पडतो हे पाहणारे आ.थोरात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात थांबुन काय करत होते? भ्रष्टाचाराच्या फाईल काढु नयेत म्हणुन मुख्यमंत्र्यांचे पाय दाबत होते की, भाजप मध्ये घ्या म्हणुन विनवणी करत होते यावरही त्यांनी बोलले पाहीजे असे आव्हान माजीमंत्री आ.विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला प्रत्युत्तरात दिले आहे.
सत्तेत सहभाग असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाला आठ आठ दिवस मुख्यमंत्री भेटीची वेळ देत नाहीत हेच मोठे दुर्दैव असल्याकडे लक्ष वेधून येवढी लाचारी पत्करुन सत्तेत का राहाता? सत्तेत आम्हाला स्थान राहुद्या यासाठीच आता मातोश्रीवर वा-या सुरु असल्याची टिका आ.विखे पाटील यांनी केली.मागील पाच वर्षे त्यांना सभागृहात बोलण्यासही वेळ नव्हता. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळातील कारभारावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. भ्रष्टाचाराच्या फाईल बाहेर येवू नयेत यासाठीच ते मागील युती सरकारच्या विरोधात शब्दही काढण्याची हिम्मत दाखवु शकले नसल्याचा थेट आरोप आ.विखे पाटील यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात थांबुन थोरात काय करत होते? भ्रष्टाचाराच्या फाईल बाहेर येवू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांचे पाय दाबत होते की भाजप प्रवेशाची बोलणी करत होते यावरही आ.थोरातांनी बोलले पाहीजे असा सल्ला आ.विखे पाटील यांनी दिला. महसुल मंत्री असताना मागील कार्यकाळात खासगी सचिव असलेले सेवानिवृत्त आधिकारी पुन्हा थोरातांच्या कार्यालयात कसे, स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या आधिका-यांना पुन्हा घेण्याचे गौडबंगाल काय, हे एकदा राज्यातील जनतेला कळु द्या अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले.
Post a Comment