गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने केले हे नियम


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पोलिस आणि महापालिका प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तथापी बाजारपेठेतील दुकाने पुर्ण बंद न करता व्यापार्‍यांशी समन्वय साधून गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाजारपेठांमध्ये तीन आणि चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या परिसरात रुग्ण आढळून येतात तो परिसर सील करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी व्यापार्‍यांची बैठक घेतली. महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशन वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांसह वाहतूक शाखेचे अधिकारी, मनपाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

महापालिका आयुक्त व व्यापार्‍यांच्या समन्वय बैठकीत निर्णय

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बाजारपेठेत ऑड-ईव्हन पद्धत अमलात आणून गर्दी टाळता येईल, असा प्रस्ताव प्रशासनाने बैठकीत मांडला मात्र दुकाने बंद ठेवण्याऐवजी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्याबाबत यावेळी व्यापार्‍यांनी सहमती दर्शवली. ठिकठिकाणी बॅरिकेटस् लावून गर्दी कमी करणे शक्य आहे त्याचबरोबर वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने तीन आणि चार चाकी वाहनांना बाजारपेठेत प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तीन आणि चार चाकी वाहने बाजारपेठेत येऊ न दिल्यास वाहतूक कोंडी होणार नाही तसेच गर्दीही टाळता येणार आहे.

शहरात रस्त्यांवर लागणार्‍या हातगाड्यांवर कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. दुकाने बंद ठेवण्याऐवजी गर्दी टाळण्यासंदर्भात प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांची दुकानांमध्ये काटेकोर अंमलबजावणी करण्याची तयारी व्यापार्‍यांनी दाखवली आहे. तसेच दुकानांमध्ये गर्दी टाळण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात येतील असे व्यापार्‍यांनी सांगितले. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणासाठी काही स्वयंसेवक प्रशासनाला मदत करतील असे यावेळी ठरविण्यात आले.

बाजारपेठेत गर्दी होणार नाही यासाठी दुकानांमध्ये येणारा माल सकाळी 7 ते 9 यावेळेत उतरवून घेण्यास व्यापार्‍यांनी सहमती दर्शवली. प्रशासनाच्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करुन व्यापार्‍यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.

बैठकीस व्यापारी असो.चे पदाधिकारी किरण व्होरा, प्रदीप गांधी, ईश्‍वर बोरा, प्रतिक बोगावत, संतोष बोरा, ललित गुगळे, संजय लोढा, राजू बोथरा, पवन किथानी, येवलेकर, डिक, सुशिल भळगट, मिलापचंद पटवा आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post