वीज बील दरवाढ ही म्हणजे झोपेत जनतेच्या डोक्यात घातलेला दगड
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोना संकटाच्या काळात महावितरणने केलेली वीज बील दरवाढ ही म्हणजे झोपेत जनतेच्या डोक्यात घातलेला दगड असल्याचा आरोप मनसेच्यावतीने करण्यात आला असून याच्या निषेधार्थ मनसेच्यावतीने सोमवार (दि.29 जून) पासून एक मेल, लाईट बिल हे आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती नितीन भुतारे यांनी दिली.
याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन पाठवविण्यात आले आहे. नगर शहरातील सर्व वीज बिल तक्रारदार यांनी आपले वीज बिलाचे फोटो काढून ऊर्जा मंत्री यांच्या मेल आय. डी. वर पाठवावे असे आवाहनही नितीन भुतारे यांनी केले आहे. निवेदनामध्ये अनेक प्रश्न सुद्धा त्यानी विचारले असून त्यामध्ये कोरोनाच्या काळात संपूर्ण लॉकडाऊन असताना सरकारनेच अनेक सामाजिक संघटनांना जनतेला मदतीचे आवाहन केले होते, केंद सरकारने 6 महिने बँक हप्त्याची मुदत वाढून दिली. याशिवाय संपूर्ण अर्थचक्र थांबलेले असतांना 1 एप्रिल रोजी राज्य सरकारने दरवाढ का केली? व दरवाढ करताना प्रसिद्धी माध्यमातून माहिती का दिली नाही? त्यामुळे अशाप्रकारे दरवाढ करणे म्हणजे झोपेत असताना जनतेच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रकार आपल्या सरकारने केला असल्याची टीका नितीन भुतारे यांनी केली आहे.
वाढीव दरवाढ रद्द करावी व पुन्हा मीटर रिडींग घेऊन जनतेला एकाच बेसिक स्लॅबमध्ये सर्व तीन महिन्याचे बील एकत्र करुन त्याचे हप्ते पाडून वसुल करावे अशी मागणी निवेदनाद्वारे नितीन भुतारे यांनी उर्जा मंत्री यांच्याकडे केली आहे. त्याकरिता सरकारला जाग आणण्यासाठी एक मेल लाईट बील या आंदोलनात नगरच्या जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन भुतारे यांनी केले आहे.
Post a Comment