मालट्रकने दोन सख्या बहिणींना चिरडले



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरा बाहेरील बाह्यवळण रस्त्याने भरधाव वेगात जाणार्‍या मालट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. या दोन्हीही महिला केडगाव मधील असून त्या सख्या बहिणी आहेत. केडगावसोनेवाडी रस्त्यावर बायपास चौकात गुरुवारी (दि.11) सकाळी 9.20 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका व पोलिस घटनास्थळी उशिराने आल्यामुळे नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

या अपघातात मनिषा बाळासाहेब कापरे (वय 32, रा.कापरे मळा, केडगाव) ही जागीच ठार झाली आहे तर रेखा प्रशांत चव्हाण (वय 35, रा.सुचेतानगर, भूषणनगर, केडगाव) ही गंभीर जखमी झाली आहे. या दोघी बहिणींचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असून त्या सोनेवाडी येथे एका नववधूचा मेकअप करण्यासाठी हिरो प्लेझर (क्र.एम.एच.16, ए.एल.8352) या दुचाकीवरुन केडगावहून जात होत्या. सोनेवाडी बायपास चौकात अरणगावच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने (क्र.टी.एन.52, एफ.6025) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दोघेही ट्रकच्या बोनेटला अडकून सुमारे 50 फूट फरफटत गेल्या. अपघात घडताच ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला. यावेळी रस्त्याने जात असलेल्या काही नागरिकांनी 108 रुग्णवाहिका तसेच पोलिसांना फोन केला. रस्त्याने जात असलेल्या सारोळाकासार उपकेंद्राच्या आरोग्यसेविका इंदूमती गोडसे यांनी जखमी महिलेची तातडीने तपासणी करत तिला दवाखान्यात पाठविण्यासाठी मदत केली. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, राजेंद्र पठारे आदींनी घटनास्थळी धाव घेत खासगी रुग्णवाहिका बोलावून जखमी व मयत महिलेस जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.

दरम्यान, या अपघातातील जखमी व मयत या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर यांच्या पुतण्या तर राष्ट्रवादीचे केडगाव विभाग अध्यक्ष भरत गारुडकर यांच्या सख्या बहिणी आहेत.

सोनेवाडी बायपास चौकाने घेतले 9 बळी

सोनेवाडी बायपास चौकात गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात एका महिलेचा बळी गेल्यानंतर या चौकात आतापर्यंत झालेल्या विविध अपघातातील बळींची संख्या 9 झाली आहे. वारंवार अपघात होत असतानाही बांधकाम विभागाकडून या चौकात सुरक्षेच्या उपाययोजना करण्याकडे डोळेझाक होत असल्याने या ठिकाणी आलेल्या पोलिस निरीक्षक प्रविण लोखंडे यांच्यासमोर नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी नागरिकांशी चर्चा करताना पो.नि.लोखंडे यांनी सदर चौकात तातडीन गतीरोधक बसविण्याबाबत बांधकाम विभागास सूचना देण्यात येतील तसेच याबाबत आजपर्यंत दिरंगाई केल्याचा खुलासा नोटीसीद्वारे मागविला जाईल, असे आश्‍वासन दिले. मात्र, नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना या ठिकाणी बोलवा, अशी मागणी लावून धरली. त्यावेळी पोलिसांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणत्याही अधिकार्‍याने फोन घेतला नाही. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत रास्तारोकोमुळे झालेली वाहतुकीची कोंडी सोडवली.

संतप्त नागरिकांनी केले ‘रास्ता रोको’ आंदोलन

केडगाव-सोनेवाडी रस्त्याने परिसरातील 8 ते 10 गावातील नागरिक प्रवास करत असतात. या बायपास चौकात अरणगाव कडून येणारी वाहने अतिशय भरधाव वेगात येत असतात. त्यामुळे या ठिकाणी गतीरोधक टाकावेत, अशी मागणी सोनेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने यापुर्वी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आलेली आहे, मात्र तरीही बांधकाम विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे या अपघातानंतर संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी चौकातच काही काळ ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. सोनेवाडीचे संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष गोरख दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सुंबे, एकनाथ दळवी, भूषण दळवी, अर्जुन दळवी, ज्ञानदेव वारे, छगन दळवी, विठ्ठल दळवी यांच्यासह नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post