सासुरवाडीला येऊन गेलेला जावई निघाला पॉझिटीव्ह !



माय अहमदनगर वेब टीम
अस्तगाव - अस्तगावला ठाण्यावरुन आलेला जावई पॉझिटिव्ह निघाला. त्यांना वेळीच गावातून काढून दिले असले तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना नगरला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकाराने अस्तगाव परिसरात खळबळ उडाली आहे. आज रविवारी गाव संपूर्ण सील करण्यात येणार आहे.

ठाणे येथे सर्व्हिस असलेला व मुळचा नाशिक जिल्ह्यातील निफाड जवळील उगावचा रहिवाशी असलेला एक जावई तीन दिवसांपूर्वी बायको व दोन लहान मुलांसह अस्तगाव येथे सासुरवाडीला लॉकडाऊनच्या काळात राहण्यास आले होते. सुदैवाने त्यांना क्वारंटाईन करण्याच्या प्रश्नावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व ग्रामपंचायतीने ते बाहेर गावचे आहेत या मुद्यावर क्वरांटाईन करण्यास विरोध केला होता. त्यामुळे लेक जावई व त्यांची दोन मुले येथील माध्यमिक शाळेच्या पढवीत बसून होते.

त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी प्रथमदर्शनी कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. मात्र सरपंच पतीने उगावच्या सरपंचांना या व्यक्तीबद्दल माहिती विचारली असता, तेथील सरपंचांनी या जावयाचा भाऊ पॉझिटिव्ह निघाल्याचे सांगितले होते. आणि दोघे भाऊ ठाण्यासारख्या रेड झोन मध्ये सर्व्हिस करत आहेत. असे समजल्यावरुन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांनी गावातील सासर्‍यांना लेक जावयांना त्यांच्या गावी पाठवा असे सुचविले व गावात क्वारंटाईन करण्यास विरोध केला होता.

जावयाचा गावातील मेव्हुना व एक जिप चालक त्या कुटूंबाला पिंपळगाव बसवंतला पोहचविण्यासाठी गेले होते.सोडवून आल्यावर त्या दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील एकाला घरी तर दुसरा प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. मात्र घरी क्वारंटाईन केलेला गावात आला होता का? कुणाच्या संपर्कात आला होता का? काहींच्या मते त्याचे गावात एक दुकान आहे, ते त्याने दोन दिवस सलग उघडले होते, मग त्या दुकानात कोण कोण गेले? या प्रश्नांना ग्रामस्थांचे डोके चक्रावून गेले आहे. सासुरवाडीचे सासु, सासरे व तीन मेव्हुणे जेवण व पाणी देण्यासाठी शाळेत आले होते.

ते किती संपर्कात आले? ते होमक्वारंटाईन होते का? हे ही प्रश्न उपस्थित होत आहेत. जावयाच्या संपर्कातील अशा एकुण 6 जणांना करोना चाचणीसाठी नगरला पाठविण्यासाठी काल रात्री 10 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्राने कार्यवाही सुरु केली होती. ज्या जिपने त्या जावयाला त्यांच्या गावाकडे सोडण्यासाठी नेले होते. त्याच जीपमधून या 6 जणांना नगरला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एका वैद्यकीय अधिकार्‍याने जावयाच्या कुटूंबाला तपासले होते, त्यांनाही क्वरांटाईन करण्यात येणार आहे. लेक जावई पॉझिटिव्ह निघाल्याने व ते कुणा कुणाच्या संपर्कात आले, त्यांना ठाण्यावरुन येताने गावात कुणी सोडले? या विवंचनेत ग्रामस्थ आहेत. तुर्तास या पाच जणांच्या अहवालावरुन बरेच अवलंबून आहे. दरम्यान या सहा जणांचा रिपोर्ट जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत गाव आजपासून अस्तगाव सील करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र गोर्डे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post