आता मोबाईल अ‍ॅपवरून घेता येणार पीककर्ज



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - करोना संकटाच्या काळात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगामात पीक कर्ज वेळेवर मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अर्थात एनआयसीने शेतकर्‍यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे अर्ज करता येणार आहे.

पीक कर्जासाठी ऑन लाइन अर्ज करताना मोबाईलवर एनआयसी पिक कर्ज लिंक वर जाऊन शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करू शकतात. करोना संकटाच्या काळात दैनंदिन व्यवहारावर तसेच मनुष्यबळ कमतरते मुळे बॅकांच्या कामकाजावरही परिणाम झाला. मात्र, त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये, त्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाले तर त्यांना या हंगामासाठी त्याचा योग्य उपयोग करता येईल, हे जाणून जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी एनआयसीला अशा प्रकारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यास सांगितले होते.

त्यानुसार, अर्जासाठी आवश्यक माहिती या लींकमध्ये भरून शेतकरी देऊ शकतात. त्यानंतर त्या अर्जावर बँक निर्णय घेणार आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असून करोना संकटाच्या काळात बँकेसमोर रांगा लावण्याचीही गरज राहणार नाही. शेतकरी बांधवांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक संदीप वालावलकर यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post