तोतया पोलीस बनून पोलीस निरीक्षकाला दम देणारा गजाआड
माय अहमदनगर वेब टीम
पुणे – ट्रॅफिक पोलिसाचा वेश धारण करून सध्या वेशातील पोलीस निरीक्षकाला दमबाजी करणार्या तोतया पोलिसाला दबंगबाजी चांगलीच अंगलट आली आहे. पितळ उघडे पडल्यामुळे त्याला पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. हा प्रकार रविवारी (दि. 21) राजगुरूनगर परिसरात घडला. जयदीप नवीनकुमार शहा (वय 20, रा. चाकण, ता. खेड, मूळ गाव अकोले, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे.
पुणे जिल्ह्यातील खेडचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी हे रविवारी दुपारी चार वाजता मित्राबरोबर गुळाणी घाट रस्त्यावर गेले होते. रस्त्यालगत असलेल्या झाडाखाली दोघेजण बसून भेळ खात होते. यावेळी वाफगावच्या बाजूने दुचाकीवरून दोघेजण आले. दुचाकी थांबवून निरीक्षक चौधरी व त्यांच्या मित्राकडे पोलिसांच्या गणवेशात असलेल्या आरोपी जयदीप शहा याने इथे काय करता? भेळ आहे म्हणजे दारू असणारच? कुठे लपवली दारू? असे दमबाजीचे प्रश्न विचारले. तोतया पोलिसाच्या अंगावर ट्रॅफिक पोलिस युनिफॉर्म असल्याने व त्यावर महाराष्ट्र पोलिस नावाचे जर्कीग तसेच डोक्यावर कॅप असल्याने चौधरी यांनी म तू कुठल्या पोलिस ठाण्यात काम करतो?फ अशी विचारणा केली. त्यावर चाकण येथे ड्युटी करीत असल्याचे दिमाखात सांगितले.
दरम्यान, चौधरी यांच्या मित्रांनी महे खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चौधरी आहेत. यांना तू ओळखत नाही काय? अशी विचारणा केली. त्यावर तोतया पोलिसाची पुरती गडबड उडाली. साहेब तुम्ही पण का? असे म्हणून एक सॅल्युट मारून त्याने तेथून पळ काढला. त्याच्या वागण्यामुळे चौधरी यांना संशय आला आणि ठाण्यातील पोलिस कामाला लागले. हवालदार तान्हाजी हगवणे, संतोष मोरे, कोमल सोनुमे यांनी सापळा रचून राक्षेवाडी येथील गणपती मंदिरासमोर दुचाकीवर येत असलेल्या तोतया पोलिसाला थांबवून ठाण्यात नेले. पोलिसी हिसका दाखवत चौकशी केली असता तो तोतया पोलिस असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस असल्याची खोटी बतावणी करून पोलिस युनिफॉर्म परिधान करून तोतयागिरी करीत असल्याचे त्याने सांगितले.
जयदीप काही वर्षांपूर्वी चाकण ते भोसरी येथे रिक्षा चालविण्याचे काम करत असताना त्याची पोलिसांशी जवळीक झाली. त्याचा गैरफायदा घ्यावा, या हेतूने थेट गणवेश शिवून घेत तो शक्य तिथे सावज हेरू लागला. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या त्याच्या या दुकानदारीत खेड पोलिसांनी खंड पाडला. त्याने पुणे येथून एक ट्रॅफिक पोलिस गणवेश शिवून घेतला होता. तो परिधान करत फिरत होता. गणवेशावर लावलेली नेमप्लेट सापडली असल्याचे त्याने सांगितले. यापूर्वी चाकण परिसरात येथे अनेक रिक्षाचालक जास्त प्रवाशांची रिक्षातून वाहक करतात म्हणून त्यांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचे शहाने कबूल केले.
Post a Comment