हे पथक करणार 'निसर्ग'ची पाहणी
माय अहमदनगर वेब टीम
अलिबाग - महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं झालेल्या पिकांची तसेच फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक कोकण दौऱ्यावर येणार असल्याचं बोललं जात आहे. केंद्र सरकारच्या या पथकाचे प्रमुख रमेश कुमार गांता (आयएएस) हे असणार आहेत.
केंद्राचं हे पथक १५ ते १८ जून या कालावधील कोकण दौऱ्यावर येणार आहे. रमेश कुमार गांता यांच्यासोबत बी. के. कौल ( संचालक अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन, आर,एल.के. प्रसाद (संचालक, उर्जा मंत्रालय, नवी दिल्ली), ग्रामीण विकास मंत्रालय आणि कृषी मंत्रालयाचे प्रतिनिधीसुद्धा कोकण दौऱ्यावर येणार आहेत. १५ जून रोजी हे पथक मुंबईत पोहोचणार आहे तर १६ जून रोजी सकाळी भाऊचा धक्का येथून रायगड मांडवा जेट्टीकडे रवाना होणार आहे.
केंद्राचं हे पथक अलिबाग- चौल, मुरुड, श्रीवर्धनचा दौरा करणार असून १७ जूनला महाडहून रत्नागिरीला रवाना होणार आहे. केंद्रिय पथक नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्राला सादर करणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून कोकणसाठी काय व किती मदत मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून १०० कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. 'ही सुरुवात आहे. याला पॅकेज म्हणू नका. आम्ही थेट मदतीला सुरुवात केली आहे,' असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Post a Comment