लॉकडाऊन शिथील होताच या घटनेत वाढ


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहर व उपनगरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होत असताना सर्व वाहतूक व्यवहार बंद असताना चोरी व घरफोडीसह वाहन चोरीच्या घटनाही थांबल्या होत्या. परंतु, लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळताच वाहन चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. शहर व उपनगरात कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीची जणू मालिकाच सुरू झाली आहे.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने लॉकडाऊन सुरू केले. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असताना नागरिक घरातच थांबून असल्याने शहर व उपनगरात चोर्‍यांचे प्रमाण थांबले. चोर्‍यांवरच उपजिवीका असणारे गुन्हेगारांवर देखील उपासमारीची वेळ आली होती. परंतु, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडू लागले. त्यामुळे शहरात, बाजारपेठेत व अन्य ठिकाणी गर्दी वाढली. या गर्दीचा फायदा घेत वाहन चोरांनी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे ठरविले. आपली हातची सफाई दाखविण्यास सुरुवात केली. मागील आठवड्यात कोतवाली व तोफखाना हद्दीत मोटारसायकल चोरीच्या 8 ते 10 गुन्ह्यांची नोंद झाली असून मोटारसायकल चोरीच्या घटना सुरुच आहेत.
सय्यद जहीर (रा.सबजेल चौक) यांची घरासमोर लावलेली डिलक्स मोटारसायकल (क्र.एम.एच.16, बी.जे.9101) अज्ञात चोराने बुधवारी (दि.10) पहाटेच्या सुमारास चोरुन नेली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

सहकार नगर, पारिजात कॉलनी येथून राजबीरसिंग अमोलजीसिंग शाही यांची घरासमोर उभी केलेली बुलेट मोटारसायकल (एम.एच.16, बी.टी.7200) अज्ञात चोरांनी चोरुन नेली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील अनिल रतन दिवटे (वय 40, रा.येवती, ता.श्रीगोंदा) यांचा ट्रॅक्टर (क्र.एम. एच.16, बी.झेड.6114) अज्ञात चोरांनी चोरुन नेला. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस नाईक शिंदे हे करीत आहेत.

सचिन लक्ष्मण वाबळे (वय 35, रा.कारखे, वाबळे वस्ती, ता.बारामती, जि.पुणे) यांची श्रीागोंदा तालुक्यातील काष्टी येथील इंद्रप्रस्थ अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये लावलेली प्लॅटिना मोटारसायकल क्र.एम. एच.42, ए.झेड.6612) अज्ञात चोराने चोरुन नेली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास साहायक फौजदार नवले हे करीत आहेत.

इरफान अयुबखान पठाण (रा.मोमीनगल्ली, खर्डा, ता.जामखेड) यांची घरासमोर लावलेली हिरो कंपनीची डिलक्स मोटारसायकल (क्र.एम.एच.बी.एक्स.997) अज्ञात चोराने चोरुन नेली. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार भिताडे हे करीत आहेत.

मोटारसायकल चोर पकडला

कापड बाजारातील मर्चंट बँकेजवळ स्वप्निल पोपट बत्तीन (रा.शिवाजीनगर, कल्याण रोड) यांची मोटारसायकल चोरीस गेली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी तपास करुन वैभव ईश्‍वर थोरात (रा.वंजारगल्ली) यास पकडून त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल ताब्यात घेतली असून त्याने अजून कोठे व किती मोटारसायकल चोरी केल्या याबाबत पोलिस कसून चौकशी करत आहेत.

लॉकडाऊनची परिस्थिती उठल्यानंतर शहर व उपनगरात सामान्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर चोरी, घरफोडी, वाहनचोरी, मंगळसूत्र चोरी, जबरी चोरी, दरोडा या सारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होण्याची चिन्हे अधिक दिसत असल्याने पोलिसांसह नागरिकांनीही सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post