करोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबईसह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्यावतीने विविध उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. मात्र, महापालिकेने काढलेल्या वर्क ऑर्डरमध्ये तब्बल 6 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात म्हटले आहे, ‘मुंबईत करोनानं प्रचंड थैमान घातलं आहे. मुंबईची परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर चालली आहे. एवढे मोठे संकट असताना मुंबईतील प्रशासन हे भ्रष्टाचार करण्यात मग्न आहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर करोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. कोविड सेंटरसाठी लागणार्या तब्बल 23 वस्तूची 11 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर महापालिकेनं काढली असून, त्यात तब्बल 6 कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. कोविड सेंटरचं काम कंपन्यांच्या सीएसआर फंडातून होणार असल्याचं महापालिकेनं सुरूवातीला सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात महापालिकेनं त्यासाठी 11 कोटी रूपयांची वर्क ऑर्डर दिली असल्याचं उघडकीस आलं आहे. कोविड सेंटरसाठी लागणार्या वस्तू या 3 महिने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. मात्र त्यासाठी मोजलेली रक्कम ही त्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंमतीपेक्षा जास्त असल्याचे उघडकीस आले.’
उदाहरणार्थ -2 हजार उभे फॅन हे 1 कोटी 80 लाख रुपयांनी भाड्यानं घेतले मात्र, त्याची बाजारातील किंमत ही 70 लाख रुपये एवढी आहे. 80 सीसीटीव्ही हे 57 लाख 60 हजार रुपयांनी भाड्याने घेतले, मात्र याची बाजारातील किंमत ही 8 लाख रूपये एवढी आहे. एकीकडे रुग्णसंख्या आटोक्यात येत नसताना, रोज कित्येक निष्पाप लोकांचे प्राण जात असताना मुंबई महानगरपालिका प्रशासन मात्र जनतेचे पैसे लुबाडण्यात मग्न आहे. एक माणूस म्हणून एवढ्या खालच्या पातळीला कसे कोण जाऊ शकते? सत्ताधारी यावर तरी कारवाई करणार का? प्रशासनाच्या कारभारात जे चालू आहे ते खरंच खूप धक्कादायक आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Post a Comment