सरपंचाच्या खुनाचा प्रयत्न; परस्परविरोधी फिर्याद दाखल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – जेसीबीच्या साह्याने सपाटीकरण काम चालु असताना ते काम थांबविल्याचा राग आल्याने 8 जणांनी कापुरवाडीचे सरपंच व त्यांचा पुतण्या यांना शिवीगाळ, दमदाटी करीत दगडाने, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि.17) दुपारी 3 च्या सुमारास कापुरवाडी येथील कानिफनाथ मंदिराजवळ घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कापुरवाडीचे सरपंच संभाजी गोवर्धन भगत (वय-46) हे कापुरवाडी गावातुन जात असताना कानिफनाथ मंदिराजवळ सय्यदलाल चॉंदभाई शेख हा त्याच्या घराच्या पाठीमागील गावठाण जागेमध्ये जेसीबीच्या साह्याने सपाटीकरण करताना आढळुन आला. तेव्हा संभाजी भगत याने सरपंच या नात्याने ही जागा कापुरवाडी गावठाणची आहे. तुम्ही बेकायदा सपाटीकरण करू नका, असे सांगितले. याचा राग येऊन सय्यदलाल शेख, निसार सय्यदलाल शेख, शहनाज सय्यदलाल शेख, रफिक कासम शेख, परविन रफिक शेख, मुन्ना दाऊद शेख, सलमान रफिक शेख (सर्व रा. कापुरवाडी) यांनी सरपंच भगत यांना शिवीगाळ, दमदाटी करीत त्यांचा शर्ट फाडुन दगड व लाकडी दांडक्याने मारहाण करीत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा पुतण्या नवनाथ शिवाजी भगत हा तेथे आला असता जमावाने लाकडी दांडक्याने त्यालाही डोक्यात जबरदस्त मारहाण करून त्याला ही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी संभाजी भगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 307, 324, 323, 337, 504, 506, 143, 147, 148, 149, मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3)/135 च्या अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार नगरे हे करीत आहेत.
तर दुसर्या फिर्यादीत साहिल सय्यदलाल शेख (वय-39) याने म्हटले आहे की, घराच्या मागील जागेत जेसीबीने साफसफाई करीत असताना कापुरवाडीचे सरपंच तेथे आले व आम्हाला शिवीगाळ करीत काम बंद करण्यास सांगितले. त्यांना समजावुन सांगत असताना त्यांनी साहिल शेख याच्या आईच्या तोंडावर मारले. तसेच दिलीप मोहन भगत, कृष्णा उर्फ भैय्या शिवाजी भगत, दुर्गेश संभाजी भगत, ऋषीकेश उर्फ बबलु भगत, अंबिका संभाजी भगत, नवनाथ संभाजी भगत, भरत जनार्दन धामणे व इतर 2 ते 3 जण (त्यांचे नाव माहित नाही) यांनी लाकडी दांडक्याने, लोखंडी टॉमीने साहिलच्या वडिलांना, साहिलच्या भावांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सय्यदलाल शेख, शहनाज शेख, निसार शेख हे जखमी झाले.
या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी साहिल शेख याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 307, 324, 323, 337, 504, 506, 143, 147, 148, 149, मुंबई पोलिस कायदा कलम 37(1)(3)/135 मारहाणीच्या गुन्ह्याच्या नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार नगरे हे करीत आहेत.
Post a Comment