सेना-काँग्रेसमध्ये ‘सामना’ रंगला
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेख काँग्रेसला चांगला झोंबला आहे. सामनातील अग्रलेख हा अर्धवट असून तो अपूर्ण आणि ऐकीव माहितीवर आधारीत असल्याची तिखट प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देत टीकास्त्र सोडले आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमची भूमिका मांडल्यानंतर सामनाला पूर्ण माहितीच्याआधारे अग्रलेख लिहावा लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आम्ही सरकारमध्ये असताना चुकीचं वागल्याचं त्यांनी दाखवून द्यावं,असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसमध्ये नाराजी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही याबाबत वक्तव्य केले होते. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही, अशी नाराजी काँग्रेसनेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता असतानाच शिवसेनेच्या सामनामधून काँग्रेसवर टीका करण्यात आली. राजकारणातील जुनी खाट कुरकरू लागली आहे, अशा शब्दांत काँग्रेसवर टीका करण्यात आली. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन याला प्रत्युत्तर दिले.
काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही, असे स्पष्ट करत काँग्रेस नेत्यांना सामनाच्या अग्रलेखात चिमटे काढण्यात आले आहेत.
याला काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने सरकारने निर्णय घ्यावेत. यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर समस्या मांडायच्या आहेत. आम्ही आमची भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्री समाधानी होतील. जनतेच्या आणि आमच्या व्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्यानंतर सामनाला वस्तुस्थिती कळेल, मग त्यांना नव्याने अग्रलेख लिहावा, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. सामनातील अग्रलेख अर्धवट माहितीवर आधारीत आहे. त्यांनी ऐकिव माहितीवर हा अग्रलेख लिहिला आहे, असे सांगत आम्ही सरकारमध्ये असताना चुकीचं वागल्याचं त्यांनी दाखवून द्यावं, असे आव्हानच थोरातांनी दिलं आहे.
अग्रलेखामुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश
आम्ही आघाडीसोबत आहोत. आमचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा असून आघाडी भक्कम आहे, असत सांगताना सरकारमध्ये कुरबुरी होतच असतात हे सामनानेही मान्य केलं आहे, असा चिमटा त्यांनी काढला. कोणत्या बदल्यांसाठी आम्ही आग्रही नाहीत. खोटेच कुरकुरणे ऐकून तर घेतले पाहिजे. त्याशिवाय काय झाले कसे कळेल ? असा टोला लगावतानाच या अग्रलेखामुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जात आहे.
Post a Comment