नाराज काँग्रेसने टाकला पहिला बॉम्ब..!
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिसरा वाटेकरी असलेल्या काँग्रेसने प्रथमच आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. गेले दोन दिवस काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठका सुरू असून आज माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या नाराजीला तोंड फोडले.
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे एखादा निर्णय होत असताना त्यात काँग्रेसचे मतही विचारात घेणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अर्थातच राज्याच्या हिताच्या असून याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत व आमचं म्हणणं त्यांच्या कानावर घालणार आहोत, असे थोरात यांनी माध्यमांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात वारंवार बैठका होत असताना काँग्रेसला मात्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याने काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून खदखद आहे. त्यात गेले दोन दिवस काँग्रेसच्या अंतर्गत बैठकाही सुरू झाल्या आहेत. काल विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी तर आज मंत्री सुनील केदार यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सरकारमध्ये काँग्रेसचे स्थान नेमके कोणते, या मुद्द्यावर बराच खल झाला. राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या-बदल्या या सगळ्या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी थेट माध्यमांकडे आपली नाराजी व्यक्त केल्याने आघाडीत बराच अंतर्गत तणाव असल्याचे उघड झाले आहे.
Post a Comment