कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आडतेबाजार, दाळमंडई कन्टेन्मेंट झोन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील घाऊक आणि ठोक विक्रीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या आडतेबाजार परिसरात दोन दिवसात सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर कन्टेन्मेंट झोन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाकडून सकाळपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती.
शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळून येत आहेत त्यामुळे यापुर्वीच तोफखाना व सिद्धार्थनगर परिसर 7 जुलैपर्यंत कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. त्या पोठापाठ नालेगावही 8 जुलैपर्यंत कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आलेले आहे. शनिवारी (दि.27) आडतेबाजार परिसरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली होती. त्यामुळे व्यापार्यांनी स्वत:हून रविवार, सोमवार व मंगळवार असे तीन दिवस उत्स्फुर्तपणे आडतेबाजार, दाळमंडई परिसरातील व्यवहार बंद ठेवण्याची घोषणा केली होती त्यानंतर रविवारी सायंकाळी आडते बाजार परिसरात पुन्हा पाच व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग इतर भागात पसरू नये म्हणून आडतेबाजार, दाळमंडई परिसर कन्टेन्मेंट झोन करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
जिल्हाधिकारी व आयुक्तांनी केली पाहणी
आडतेबाजार परिसर कन्टेन्मेंट झोन करण्यासाठी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शहर अभियंता सुरेश इथापे यांच्या समवेत सोमवारी (दि.29) सकाळी आडतेबाजार, दाळमंडई, किंग्जगेट रोड, रामचंद्र खुंट, तपकीरगल्ली, गंज बाजार, दाणेडबरा, मंगलगेट या परिसरात फिरुन पाहणी केली. त्यानंतर संपुर्ण परिसरातील कोणकोणते रस्ते बंद करायचे? याबाबत अभियंता इथापे यांना सर्व्हे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दुपारी उशिरापर्यंत सर्व्हे करण्याचे काम सुरू होते. सर्व्हेनंतर हा परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात येणार असल्याचे अभियंता इथापे यांनी सांगितले. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी आयुक्त मायकलवार, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व अभियंता इथापे यांच्यासमवेत पुन्हा या परिसराची पाहणी केली.
कोंड्यामामा चौक परिसरातील दुकाने केली बंद
जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी कोंड्यामामा चौक परिसरात पाहणी केल्यानंतर या भागातील दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी या भागातील दुकाने तात्काळ बंद करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली. थोड्याच वेळात या परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली.
केडगावचा शाहूनगर परिसर 14 दिवसांनी झाला खुला
केडगावच्या शाहूनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा परिसर 15 जूनपासून कन्टेन्मेंंट झोन करण्यात आला होता. त्यामध्ये शाहूनगरच्या साईनगर प्रोव्हिजन स्टोअर्स, झोडपी शाळा, चर्च, साईराम ट्रेडर्स, मथुरा ब्युटी पार्लर, बी.आर. कवडे, दत्तात्रय जवक घर ते मुख्य रस्ता ते साईनगर प्रोव्हिजन स्टोअर्स हा परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करुन सिल करण्यात आला होता. गेल्या 14 दिवसांच्या कालावधीत या परिसरात अन्य रुग्ण आढळून न आल्याने हा परिसर रविवारी (दि.28) मध्यरात्री 12 वाजता कन्टेन्मेंट झोनमुक्त करण्यात आला. त्यामुळे सोमवारी (दि.29) सकाळ पासून या परिसरातील व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.
शहराच्या अन्य भागातही पसरू लागला कोरोना
शहरात सध्या कन्टेन्मेंट झोन असलेल्या सिद्धार्थनगर, तोफखाना, नालेगाव तसेच आडतेबाजार परिसरानंतर अन्य भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येवू लागले आहेत. रविवारी उपनगरातील ढवण वस्ती येथील एक, पाईपलाईन रोडवरील पद्मानगर येथील 1 तर वडारवाडी, भिंगार येथेही 1 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय भिंगार येथे सकाळी आलेल्या अहवालातही 1 रुग्ण आढळला होता. याशिवाय नवनागापूर आणि केडगावच्या शिवाजीनगर येथेही प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. त्यामुळे शहराच्या अन्य भागातही कोरोना पसरू लागल्याचे दिसून येत आहे.
8 जण झाले कोरोनामुक्त
दरम्यान, नगर जिल्ह्यातील 8 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामध्ये नगर शहरातील 4, श्रीगोंदा येथील 3 आणि कोपरगाव येथील एका रुग्णाला सोमवारी (दि.29) सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 291 झाली असून 117 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच सोमवारी सकाळी 65 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
Post a Comment