महापालिकेला लिकेज सापडेना; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर– शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अर्बन बँक रोड, खिस्त गल्ली, इमारत कंपनी या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणी येत आहे. काही महिन्यांपूर्वी या भागातील नागरिकांना ड्रेनेजचे पाणी नळावाटे येत असल्याने गॅस्ट्रोची लागण झाली होती. आता गेल्या अनेक दिवसांपासून माती मिश्रित पाणी येत आहे मात्र महापालिकेला अजूनही पिण्याच्या लाईनमध्ये माती मिश्रित पाणी अथवा ड्रेनेजचे पाणी कुठून शिरत आहे याचा छडा लागलेला नाही.

गेल्या काही महिन्यात महापालिकेच्या कर्मचा-यांनी अनेक ठिकाणी खोदून पाहिले आहे. मंगळवारी ही या भागात काळे माती मिश्रित पाणी आले. सुरवातीचे पाच सहा बदल्या जास्त माती मिश्रित पाणी नागरिकांना ओतून द्यावे लागते त्यामुळे पाण्याचीही नासाडी होत आहे. ज्यांचे पाणी सरळ टाकीत सोडले जाते त्यांच्या टाक्यात खाली माती साचली जात आहे. महापालिकेने तात्काळ ही जुनी बार्शीकरांच्या काळात टाकलेली पाईपलाईन बदलावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या भागात फेज 2 ची लाईन टाकली असून ती खूप वर वर टाकलेली आहे त्यामुळे तिचा पाणी पुरेश्या दाबाने येण्यास कितपत उपयोग होईल हे लाईन सुरू झाल्या शिवाय सांगणे कठीण आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांची सध्या तरी भिस्त या जुन्या पाईपलाईनवरच आहे.

महापालिकेने या पाईपलाईनला दिवसा वॉश आउट करावे जेणेकरून माती मिश्रीत साचलेले पाणीही निघून जाण्यास मदत होईल. या दोन तीन दिवसात झालेल्या जोरदार पावसाचे पाणी व्हॉल्व्ह मधून आत शिरून हे जास्त माती मिश्रित पाणी आले असण्याची शक्यता आहे. फेज 2 काम केल्यावर खोदलेल्या भागावर पॅचिंग न केल्याने सतत खडी वर येणे, धूळ उडणे या समस्येलाही येथील रहिवाशी व व्यापार्‍यांना समोर जावे लागत आहे.

अनेक ठिकाणी या खोदकामात मातीच्या भरावाचे चढण झाल्याने पावसाचे पाणी सरळ दुकानात शिरण्याचा प्रकारही होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post