...म्हणून नागरिकांचे आरोग्य धोक्यात



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर शहरातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून नळावाटे गढूळ पाणी पुरवठा होत असून या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने तातडीने याची दखल घेवून उपाययोजना कराव्यात अन्यथा महापालिकेत उपोषण सुरु करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

या संदर्भात शहरातील प्रभाग क्र. 20 मधील हलवाई गल्ली व परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, हलवाई गल्ली व परिसरात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पासून दुषित पाणी पुरवठा होत आहे. पाण्यास दुर्गंधीयुक्त घाण वास येत आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात महपालिकेच्या अधिकारी कर्मचार्‍यांना अनेकदा कळवूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. या भागातील पाईपलाईन खूप जुनी झाली असल्याने तिला काही ठिकाणी गळती लागलेली असावी, त्यातून दुषित पाणी या पाईप लाईन मध्ये जात असावे अशी शक्यता आहे. या शिवाय या परिसराला अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अतिशय कमी प्रमाणात मिळणारे पाणीही दुषित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागातील नागरिक नियमित पणे मालमत्ता कर भरत असतात तरीही त्या कराच्या बदल्यात महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post