राज्यात करोनारुग्णांचा नवा उच्चांक
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात करोना संसर्गाचा कहर कायम असून आज रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला. दिवसभरात राज्यात करोनाचे ५ हजार ३१८ रुग्ण वाढल्याने त्यासोबत चिंताही वाढली आहे. राज्यात करोनामुळे आणखी १६७ रुग्ण दगावले असून त्यासोबत समाधानाची बाब म्हणजे आज विविध रुग्णालयांतून ४४३० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. रुग्णवाढीचा वेगही कमी झालेला नाही. गेल्या २४ तासांत राज्यात ५३१८ नवीन रुग्णांची भर पडली. राज्यात आतापर्यंत ८ लाख ९६ हजार ८७४ जणांची करोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील १ लाख ५९ हजार १३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १७.७४ टक्के इतके हे प्रमाण आहे. राज्यात सध्या ६७ हजार ६०० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज ४४३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण ८४ हजार २४५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आज १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेल्या ८६ मृत्यूंपैकी ४१ मृत्यू मुंबई शहरातील आहेत. ठाणे मनपा- १, कल्याण-डोंबिवली मनपा- १, भिवंडी-निजामपूर मनपा- १, वसई-विरार मनपा- १, पनवेल मनपा- १, नाशिक- १, मालेगाव मनपा- १, धुळे- ३, जळगाव- ५, पुणे मनपा- १५, पिंपरी-चिंचवड मनपा- ३, सोलापूर मनपा- १, सातारा- १, कोल्हापूर- १, सांगली- १, औरंगाबाद - १, लातूर मनपा- १, उस्मानाबाद- १ असे अन्य शहरातील मृत्यू आहेत. राज्यात सध्या ५ लाख ६५ हजार १६१ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Post a Comment