सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची होतेय पायमल्ली
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मध्य वस्तीतील काही भाग प्रशासनाने सील केला आहे. असे असतानाही नागरिकांना मात्र कोरोनाबाबत फारसे गांभीर्य नसल्याचेच दिसत असून, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे.
कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शहरातील नालेगाव, तोफखाना, चितळे रोड परिसर प्रशासनाने सील केला आहे. त्याचबरोबर कोरोनाला टाळण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरु असताना नागरिक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहायला मिळत आहे.
शहरातील शनी चौकात शनिवारी (दि.27) सकाळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची नागरिकांनी पूर्णत: पायमल्ली केल्याचे पहायला मिळाले. अनेकांच्या तोंडाला मास्कही बांधलेले नव्हते. शनी चौकात दररोज मजुरांची गर्दी होत असते. शनिवारी मात्र या मजुरांबरोबरच स्थानिक नागरिकही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले होते. कोरोनाबाबत कोणतीही दक्षता नागरिक घेत नसल्याचे पहायला मिळत आहे. अशाच पद्धतीने शहरातील रस्त्यांवर, दुकानांमध्ये नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र आहे. तथापि या बेजबाबदार वर्तणुकीमुळे एकप्रकारे कोरोनाला निमंत्रणच दिले जात असल्याचे दिसते. नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
Post a Comment