कर्णबधिर बालक
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - प्रत्येक बहिर्या मुलाची व बहिर्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती चांगली असणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांचे इतरांशी जुळवून घेणे फार सोपे जाते.
योग्य प्रशिक्षणानंतर सक्षम निरीक्षण शक्तीमुळे कर्णबधीर बालक वाचू शकतो. योग्य शिक्षणामुळे बर्याचशा व्यवसायांमध्ये कार्यक्षम होण्यामध्ये कमी अधिक प्रमाणात यशस्वी होतो.
ओठांचे निरीक्षण करण्यास शिकविणे फार जिकिरीचे काम असते. त्यासाठी आई-वडिलांमध्ये पुरेशी सहनशक्ती असावी लागते. प्रयत्नांच्या यशासाठी बराच वेळ वाट पाहावयाची आवश्यकता असते. कारण सुरुवातीच्या काळात ते सहकार्य देत नाही. त्याच्या कलाने बर्याच वेळा वागावे लागते. त्यात आई-वडिलांचा बराचसा वेळ व त्यांचे प्रयत्न वाया जातात. त्यांना निराश होण्याची वेळ येते. मूल बरेच दिवस प्रगती दाखवीत नाही. कारण बर्याचदा ओठांचे निरीक्षण करण्याची स्वत:ला गरज आहे. अशी त्याच्यामध्ये जाणीव निर्माण करण्यात त्यांचा वेळ जातो. ही जाणीव निर्माण होण्यास अवधी व प्रयत्न बरेच लागतात. या प्रयत्नांना सहजासहजी यश मिळू शकत नाही.
जरी बालक प्रतिक्रिया वा प्रगती दाखवत नसले तरी तुमच्या या वागण्यातून, प्रेमळ बोलणे व शिकविण्याचा परिणाम सुप्तपणे होत असतो. त्याला ओठ वाचावयाची म्हणजेच ओठांच्या हालचाली पाहून काय शब्द बोलले असाल हे ओळखावयाची सवय लागते. यावरून त्याला हळूहळू काय बोलावे याचे आकलन होण्यास सुरुवात होते.
सुरुवातीला त्याला बोलणे समजत नाही किंवा लक्षात येत नाही वा त्याचा अर्थ कळत नाही. तुम्ही त्याला काहीतरी सांगू पाहात आहात हे त्याच्या लक्षात आणून द्यावे. अतिशय साधी वाक्ये बोला. जे बोलाल त्या विषयीच्या वस्तू त्याला दाखवा. परंतु हे करतांना ते तुमच्या चेहर्याकडे पाहात असेल तेव्हाच बोला. त्यामुळे ओठांच्या हालचाली पाहून ते आवाज शिकते. आवाजाचा व वस्तूचा संबंध शिकते. त्यामुळे वस्तूच्याबद्दल त्याला माहिती मिळते.
बहिर्या मुलांना चेहर्याकडे पाहण्याची सवय लहानपणापासूनच लावावी लागते. सर्वसामान्य मूल ऐकून भाषा शिकते तर बहिरे मूल भाषा पाहून शिकते. म्हणून बहिरे मूल जेव्हा जेव्हा शिक्षिकेकडे, आईकडे किंवा बोलणार्याकडे पाहील तेव्हा त्याला भाषा ओठावर पाहायला मिळाली पाहिजे. आपण कोणत्या वस्तूविषयी बोलत आहोत ती वस्तू त्याला दिसली पाहिजे. बाळाला दूध हवे असेल तर दुधाची बाटली घेऊन ‘बाळाला दूध हवं ना? देते हं’ असे म्हणावे म्हणजे ओठांची हालचाल वस्तू यांची सांगड घालायला मूल शिकते. तसेच मूल जेव्हा आपल्याला काही सांगत असेल तेव्हा आपणही त्याच्याकडे पाहून बोलावे, त्याला प्रतिसाद द्यावा व उत्तेजन द्यावे यातूनच संभाषणाची सुरुवात होईल.
Post a Comment