कन्टेन्मेंट झोनमध्ये 24 तास मोफत अॅम्ब्युलन्स व डॉक्टर सेवा उपलब्ध
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शहरातील काही भागात कन्टेन्मेंट झोन जाहीर केलेले आहेत. या भागातील नागरिकांना इमर्जन्सी काळात काही वेळा रुग्णवाहिका वेळीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी लक्षात घेऊन नागरिकांना इमर्जन्सी काळात वेळीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी आणि तीही अवघ्या काही मिनिटातच यासाठी माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी तोफखाना कन्टेन्मेंट झोनमध्ये नागरिकांसाठी 24 तास पूर्णतः मोफत रुग्णवाहिका व डॉक्टर सेवेचा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. यासंदर्भात बोलताना धनंजय जाधव यांनी सांगितले की, तोफखाना परिसर प्रशासनाने कन्टेन्मेंट झोन जाहीर केलेला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण परिसर बंद आहे. अशावेळी नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नाही. तसेच आपली वाहनेही बाहेर काढता येत नाहीत. या काळात एखाद्या नागरिकाला काही वैद्यकीय सुविधेची गरज पडल्यास त्यास ती तातडीने मिळणे आवश्यक असते. केवळ कोरोना हाच आजार सध्या आहे असे नाही तर इमर्जन्सी इतर आजार उद्भवू शकतात. अशावेळी रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) तातडीने मिळणे आवश्यक असते. कारण कन्टेन्मेंट झोनमधील दवाखाने बंद असतात. त्यामुळे कोणाला जर अचानक काही झाले तर त्यास बाहेरील दवाखान्यात तातडीने वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे असते.
शासनाची 108 रुग्णवाहिका उपलब्ध होते. परंतु केवळ 108 च्या रुग्णवाहिकेवर अवलंबून न राहता त्याआधी नागरिकांना तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने साईद्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून तोफखाना कन्टेन्मेंट झोनमध्ये नागरिकांसाठी 24 तास मोफत डॉक्टर व रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेची रितसर परवानगी घेण्यात आल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. सदरची रुग्णवाहिका आपल्या कार्यालयासमोर उभी करण्यात आलेली आहे. ही रुग्णवाहिका अवघ्या दोन मिनिटात नागरिकांना उपलब्ध होत आहे.
त्यासाठी तीन हेल्पलाईन नंबर देण्यात आले असून, नागरिकांनी धनंजय जाधव-9860655555, राहुल मुथ्था9545567088, सोनू बोरुडे- 9921597442 या क्रमांकावर संपर्क साधावा. इमर्जन्सीत नागरिकांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावेत, त्यांचे जीव वाचवावे या एकमेव उद्देशाने ही मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण ही सेवा सुरू केली असून, कन्टेन्मेंट झोन असेपर्यंत ही सेवा सुरू ठेवणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
महापालिकेने कन्टेन्मेंट झोनमध्ये अॅम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करावी
शासनाची 108 रुग्णवाहिका नागरिकांना उपलब्ध होते. परंतु काही वेळा ती वेळेवर मिळत नाही. अशावेळी रुग्णांच्या अडचणीत वाढ होते. त्यामुळे कन्टेन्मेंट झोनमध्ये महापालिकेने रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी 24 तास रुग्णवाहिका उभी करावी, अशी मागणी धनंजय जाधव यांनी केली आहे.
तोफखाना व सिद्धार्थनगर कन्टेन्मेंट क्षेत्रात निवासी डॉक्टरची नियुक्ती करावी
अहमदनगर शहरातील तोफखाना व सिद्धार्थनगर हा परिसर कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने कन्टेन्मेंट झोन केला असल्याने त्या भागातील रुग्णालय व मेडिकल बंद करण्यात आली आहे. तसेच ज्यांना कोरोनाची लक्षणे नाही अशा सामान्य नागरिकांना किरकोळ आजारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागत असल्याने त्यांच्यावर मानसिक दडपण येत आहे. त्याकरिता तोफखाना व सिद्धार्थनगर कन्टेन्मेंट भागात 24 तास निवासी डॉक्टरांची व्यवस्था करण्याची गरज आहे. तरी वरील परिस्थितीचा विचार करून आजच तोफखाना व सिद्धार्थनगर कन्टेन्मेंट झोनमध्ये 24 तास निवासी डॉक्टरांची व्यवस्था करावी, अशी मागणीही जाधव यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
Post a Comment