अमेरिकेत 27 जुलैला व्हॅक्सिनची ‘मेगा ट्रायल’




माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्ना 27 जुलैपासून कोरोनावरील व्हॅक्सिनची तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू करणार आहे. चाचणी हे व्हॅक्सिन जगभरातील लोकांना कोरोनापासून वाचवू शकेल, की नाही, यावर शिक्‍कामोर्तब होणार आहे. व्हॅक्सिन सुरक्षित आहे आणि शरीरात अँटिबॉडीज्चा (प्रतिजैविके) स्तर वाढविण्यात सक्षम आहे, याबाबतची चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही नवी व अंतिम चाचणी जाहीर करण्यात आली आहे. तिसर्‍या टप्प्यातील चाचणीअंतर्गत 30 हजार स्वयंसेवकांना व्हॅक्सिनचे डोस देण्यात येतील.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ग्रेट न्यूज’ म्हणून या वृत्ताचे स्वागत केले आहे. जगभरातील 1.3 कोटी लोक या आजाराने आजवर संक्रमित झाले आहेत. शतकातील या सर्वांत मोठ्या महामारीदरम्यान अमेरिकेतील या वृत्ताने मोठा दिलासा दिला आहे. व्हॅक्सिनचे उत्पादन अमेरिकेपुरते नव्हे, तर मानवतेसाठी केले जाणार आहे आणि त्यासाठी मॉडर्नाने अपेक्षित पायाभूत सुविधा उभारून झाल्या आहेत, असे मॉडर्नाकडून सांगण्यात आल्याने ही खरोखर ग्रेट न्यूज ठरली आहे!

मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिफन बेन्सेल यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 हजार स्वयंसेवकांची विभागणी दोन गटांत केली जाईल. 50 टक्के लोकांना व्हॅक्सिनचा 100 मायक्रोग्रॅम डोस दिला जाईल. अन्य 50 टक्के लोकांवर सामान्य उपचार केले जातील.

आधीच्या चाचणीत एमआरएनए 1273 नावाचे हे व्हॅक्सिन पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मॉडर्नाने आवश्यक ते जनुकीय संकेत (जेनेटिक कोड) प्राप्‍त करण्यापासून ते मानवी चाचणीपर्यंतचा प्रवास अवघ्या 42 दिवसांत पूर्ण केला. जनावरांच्या आधीच माणसांवर चाचणी करण्यात आली, हेही पहिल्यांदाच घडले.

16 मार्च रोजी सिएटल येथे दोन लेकरांची आई असलेल्या 43 वर्षांच्या जेनिफर नावाच्या महिलेला पहिल्यांदा डोस देण्यात आला. पहिल्या चाचणीत 18 ते 55 वर्षे वयोगटातील 45 निरोगी स्वयंसेवक सहभागी करून घेण्यात आले होते. पहिल्यांदा 8 जणांना डोस देण्यात आले. या चाचणीतच हे व्हॅक्सिन कोरोना रोखण्यात सक्षम असल्याचा आमचा विश्‍वास दुणावला होता, असे मॉडर्नाच्या संशोधकांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post