अहमदनगर - शहराच्या जवळच असलेल्या कल्याण रोड परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. वारंवार मागणी करुनही महापालिकेकडून मुलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत यात तातडीने उपाययोजना करा अन्यथा सर्व नागरिक महापालिकेकडे मलामत्ता कर भरणार नाहीत, असा इशारा या भागातील नगरसेवकांनी महापालिकेच्या ऑनलाईन सभेत दिला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या 3 जुलैच्या परिपत्रकानुसार महापालिकेची सर्वसारधारण सभा बुधवारी (दि.29) दुपारी 1 वाजता ऑनलाईन सुरू झाली.
महापालिकेच्या सभागृहात महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, नगरसचिव एस. बी. तडवी, सभागृहनेते स्वप्निल शिंदे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर आदी मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते तर नगरसेवकांनी ऑनलाईन अॅपद्वारे या सभेत सहभाग घेतला. सभेत सुरुवातीलाच नगरसेवक सचिन शिंदे यांनी कल्याण रोड परिसरातील सम स्या मांडल्या. तसेच कुमार वाकळे यांनी शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी केली. माजी महापौर सुरेखा कदम यांनी शहरात महापालिकेतर्फे कोरोना टेस्ट लॅब सुरू करावी तसेच रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याची मागणी केली.
अनिल शिंदे यांनी कोरोना उपाययोजनांसाठी शासनाकडून किती निधी प्राप्त झाला व त्याचा कशाप्रकारे खर्च करण्यात आला याचा तपशील सर्व नगरसेवकांना देण्यात यावा अशी मागणी केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही या सभेत विविध नगरसेवकांनी केली. प्रकाश भागानगरे यांनी शहरात सर्व कामे ठप्प आहेत त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या कामांना निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी यावेळी केली.
Post a Comment