उड्डाणपुलाच्या कामाला ऑगस्टमध्ये होणार सुरुवात - खा.डॉ.विखे
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील बहुचर्चीत उड्डाणपुलाच्या कामाला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिलेली असून हे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी गुरुवारी (दि.16) सकाळी पत्रकार परिषदेत दिली. खा. डॉ. विखे यांनी शहराचे आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या समवेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले, उड्डाणपुलाच्या कामाबातच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. भूसंपादनाची प्रक्रियाही झालेली आहे. काही खासगी जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न असून तोही लवकरच मार्गी लागेल. भूसंपादनामध्ये कोणी आल्यास त्याचे पैसे कोर्टामध्ये जमा करुन जमीन सरकार ताब्यात घेईल. हा प्रकल्प दोन वर्षाच्या कालावधीत पुर्ण होणे अपेक्षीत आहे. या कामाला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची एनओसी आवश्यक होती. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे संरक्षणमंत्रालयाने मागील आठवड्यातच या कामासाठी परवानगी दिलेली आहे. आता कुठल्याही परिस्थितीत ऑगस्टमध्ये पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू केले जाणार आहे. या कामात जो कोणी अडथळा आणेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही खा. विखे यांनी दिला.
पुलाचे काम पुर्ण होईपर्यंत पक्षभेद विसरुन एकत्र
या प्रकल्पासाठी केंद्र-राज्यातील नेते, महसूल प्रशासन, महापालिका पदाधिकारी यांच्याबरोबरच आ. संग्राम जगताप यांचेही सहकार्य मिळालेले आहे. आमदार संग्राम जगताप व आपला राजकीय पक्ष वेगवेगळा असला तरी आम्ही शहरातील उड्डाणपुलाचे काम पुर्ण होईपर्यंत पक्षभेद विसरुन एकत्र राहणार आहोत. एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार नाहीत. राजकारण तर चालूच राहिल मात्र नगर शहरातील महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत. असेही खा. विखे म्हणाले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ आवश्यक
नगर जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोनाचे 10 रुग्ण होते. मात्र आता लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर त्यात प्रचंड वाढ झाली असून रुग्ण संख्या 1 हजाराच्या पुढे गेलेली आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 5 ते 10 दिवसांचा लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रसार सध्या झपाट्याने होत असल्याने ही परिस्थिती नियंत्रणात न आल्यास मोठे तांडव निर्माण होणार आहे. त्यामुळे एक डॉक्टर म्हणून आपले असे मत आहे की, प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन 5 ते 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करावा. प्रशासनाने निर्णय न घेतल्यास यामुळे उद्भवणार्या परिस्थितीला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे जबाबदार राहतील, असा इशाराही खा. विखे यांनी यावेळी दिला.
प्रशासनाने अभ्यासपुर्वक प्रस्ताव द्यावा- आ. संग्राम जगताप
नगर शहरात या पुढील काळात लॉकडाऊन करायचा असेल तर त्याबाबत प्रशासनाने अभ्यासपूर्वक प्रस्ताव तयार करुन तो सादर करावा. त्याबाबत प्रस्ताव पाहून आपली भूमीका स्पष्ट करू, असे आ. संग्राम जगताप यांनी यावेळी सांगितले. तसेच नगर शहराच्या वैभवात भर घालणार्या उड्डाणपुलाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला हे चांगले झाले आहे. शहराच्या विकासासाठी आमचे नेहमीच पक्षभेद विसरुन सहकार्य राहील असेही ते यावेळी म्हणाले.
Post a Comment