नवी दिल्ली - राजस्थानमधील गेहलोत सरकारवरील संकट काही कमी होताना दिसत नाही. सध्या येथे जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे आणि अशा परिस्थितीत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे.
यात आता राज्यपालांचीही भर पडली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याच्या आधीही राज्यपाल कलराज मिश्रा यांच्यावर अरोप करत ते योग्य निर्णय करत नसल्याचे म्हणाले होते. इतकेच काय तर, जर राज्यपाल त्यांचे म्हणने ऐकणार नसतील तर राज्यातील जनताच राजभवनला घेराव घालतील, असेही गहलोत यांनी म्हटले होते. आता राजस्थान काँग्रेसनेही राज्यपाल कलराज मिश्रा यांच्यावर, ते केंद्राकडून येणारे प्रश्न मांडत आहेत, असा आरोप केला आहे. तसेच काँग्रेसनेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, राजभवनातून दिल्लीतील 'मास्तर' प्रमाणेच विधाने बोलली जात आहेत.
केली होती अधिवेशनाची मागणी
सिंघवी म्हणाले की, राज्यपाल यांनी घटनात्मक पदाचा दुरुपयोग केला आहे. मुख्यमंत्री गेहलोत आपल्या समर्थक आमदारांसह शुक्रवारी राजभवनात गेले होते. त्यावेळी राज्यपालांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. त्यासर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आता राज्यपाल यांनी विधानसभा अधिवेशन बोलवावे. अधिवेशन बोलवावे यासंदर्भाची मागणी सरकारकडून ३१ जुलैपासून केली जात आहे. सर्वप्रथम प्रथम मुख्यमंत्री गहलोत यांनी सोमवारी म्हणजे २७ जुलैपासून विधानसभेच्या अधिवेशनाची मागणी केली होती.
राज्यपाल अनेक गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत असे सिंघवी म्हणाले. तसेच 'कोरोना संकटाच्या वेळी कोणत्या राज्यात विधानसभेचे सत्र सुरू आहे, असा प्रश्न राज्यपालांनी विचारला होता. सध्या देशातील अनेक राज्यात विधिमंडळे सुरू आहेत. ज्यात पंडुचेरी, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे. हे राज्यापालांनी जाणून घ्यायला हवे होते.
आमदारांच्या हालचालींबद्दल नाही विचारू शकत
सिंघवी म्हणाले की, राज्यपालांनी प्रश्न विचारले आणि त्यांनी सक्रियता दाखवली हे कौतुकास्पद आहे. पण आमदारांच्या उपस्थिती व त्यांच्या हालचालींसंबंधित प्रश्न त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत. तसेच हे प्रकरण पूर्णपणे विधानसभा अध्यक्ष किंवा सचिवालय यांच्या अखत्यारित येतो, असेही सिंघवी म्हणाले.
Post a Comment