कोरोना : जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी आलेल्या दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि इतर सहभागी यंत्रणांच्या कामाबाबत कौतुकोद्गार काढले. लगतच्या जिल्हयातील परिस्थिती पाहता अहमदनगर जिल्हयातील परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे. जिल्हाभरात सर्वेक्षण वाढवून संभाव्य रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा, अशी सूचना त्यांनी केली. ही परिस्थिती अशीच नियंत्रणात राहील, यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर, अॅंटीजेन चाचण्या होत आहेत. खाजगी प्रयोगशाळांतून तपासणी होत आहे. ऑगस्टअखेरपर्यंत जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या दीड लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
केंद्गीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. सितीकांता बॅनर्जी या दोन सदस्यीय पथकाने आज अहमदनगर येथे भेट दिली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांसोबत आढावा बैठक घेण्यापूर्वी या पथकाने जिल्हा रुग्णालय येथील कोविड हॉस्पिटल, दीपक हॉस्पिटल येथील कोविड हॉस्पिटल आदी ठिकाणी तसेच श्रमिकनगर आदी भागांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. साळुंके, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आदी उपस्थित होते.
त्यानंतर या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी त्यांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
लगतच्या इतर जिल्ह्यापेक्षा अहमदनगर जिल्हयाची परिस्थिती नियंत्रणात आहे. ही परिस्थिती नियंत्रणात राहील यासाठी तयारी महत्वाची आहे. कोरोना नियंत्रणासाठी झटणार्या प्रत्येक यंत्रणांनी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढले की बाधितांची संख्या वाढेल. त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, रुग्णाचा मृत्यू होणार नाही, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वेक्षण मो्ठ्या प्रमाणात हाती घेणे, ज्या व्यक्तींना इतर आजार आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा परिषद अशा सर्व यंत्रणा चांगले काम करीत असल्याचे यावेळी डॉ. कुशवाह यांनी नमूद केले.
कोरोना प्रतिबंधासाठी आता लॉकडाऊन हा पर्याय असणार नाही. मात्र अनलॉक करताना नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे आदी बाबींचे पालन करणे अ्त्यावश्यक आहे. यंत्रणांनीही त्यासाठी आग्रह धरला पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संस्था आदींनी यासाठी लोकांमध्ये अधिक जाणीव निर्माण करुन देण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या काळात कोरोनावर अजून औषध उपलब्ध नसताना मास्क वापरला तर बर्याच मोठ्या प्रमाणात आपण कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखू शकतो, असे ते म्हणाले.
ग्रामीण भागात लोकसंख्या काही भागात विखुरल्यामुळे संसर्गाचा प्रादुर्भावाची शक्यता कमी असली तरी तेथे वेळेवर सर्वेक्षण आणि आजारी रुग्णांना वेळेत उपचार आदी बाबी महत्वाच्या आहेत, असे डॉ. कुशवाह म्हणाले. यापुढील काळात तालुकापातळी आणि गावपातळीवरही अधिक सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. मृत्यू होणार नाहीत, यासाठीचा प्रयत्न असला पाहिजे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशा रुग्णांनी स्वताहून त्यांच्या सकारात्मक बाबी लोकांना सांगितल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. बॅनर्जी म्हणाले, कोरोनासंदर्भात लोकांमधील भीती कमी केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संस्थांनी प्रशासना इतकीच महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी अधिक व्यापक पद्धतीने लोकांपर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे.
दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. येत्या ऑगस्टअखेरपर्यंत जिल्ह्यात दीड लाख चाचण्या होतील, असे नियोजन असल्याचे ते म्हणाले.
या बैठकीला जिल्हा आरोग्य यंत्रणा, मनपा आरोग्य विभाग यांच्यासह संगमनेर, राहाता, पाथर्डी आणि श्रीरामपूर येथील तहसीलदार आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
Post a Comment